महापौर बंगल्यावर शिवसेनेचे सॅनिटायझर मारो आंदोलन - शिवसेना
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तरी देखील महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता केली जात नाही. तसेच शहरात सॅनिटायझरची फवारणी सुद्धा केली जात नसल्याचा आरोप करत, महापौरांच्या बंगल्यावर शिवसेनेच्या वतीने सॅनिटायझरची फवारणी करुन, निषेध व्यक्त केला आहे. आता शहरात शिवसेना सॅनिटायझरची फवारणी करून शहरातील जनतेची काळजी घेईल, असे शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडदे यांनी सांगितले. 'अमरावतीतील नागरिकांना महापौरांनी वाऱ्यावर सोडले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खरेतर सॅनिटायझरची फवारणी करणे आवश्यक होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केले आहे', असा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने अमरावतीच्या महापौर बंगल्यावर सॅनिटायझरची फवारणी करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन करतांना थेट महापौर बंगल्यावर जातांना गेट वरून चढून आत मध्ये प्रवेश केला. त्यांनी येथे फवारणी केली, मात्र यावेळी संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केले गेले.