हैदराबाद - 'आरोग्यम् धनसंपदा' म्हणजे 'आरोग्य हीच खरी संपत्ती आहे' हे नेहमीच कानावर पडणारे बोधवाक्य आहे. आजच्या प्रगतीशील जगात विविध आजारांवर यशस्वीरित्या मात करण्याइतकी प्रगती मानवाने साधली आहे. काही आजार तर कायमचे हद्दपार झाले आहेत.
'३० जानेवारी २०२१' हा द्वितीय वार्षिक जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार दिवस (एनटीडी) म्हणून पाळण्यात आला. वर्ल्ड नेग्लेक्टेड ट्रॉपिकल आजारासंबंधी जागरुकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश्य आहे. 'नेग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसिज' यावर अद्यापही समाजात जागरुकतेचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.
उष्णकटिबंधीय प्रदेशातील मागास लोकसंख्येत जास्त प्रादुर्भाव असलेल्या या एनटीडीचे निर्मूलन करणे, हे सध्या जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट आहे. जगभरात ५ पैकी १ व्यक्ती एनटीडीग्रस्त आहे. हा आजार मुख्यत: आशिया आणि आफ्रिका खंडातील मागास देशांमध्ये आढळतो. वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष, लोकांना स्वच्छ पाणी उपलब्ध नसणे यासह मानवी कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणे यामुळे प्रामुख्याने हे आजार फोफावतात.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, ‘जगभरातील एक अब्ज लोकांवर एनटीडीचा परिणाम होतो. यामुळे वेदना होतात आणि अपंगत्व येते. या आजारांमुळे मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे बंद होतात. प्रौढ व्यक्ती कामावर जाऊ शकत नाहीत. आर्थिक नियोजनाचा बोजवारा उडतो. बाधित व्यक्तीसह कुटुंबीयांना हलाखीचे जीवन जगावे लागते व यासह असमानतेचा सामना करावा लागतो.
एनटीडीमुळे येणाऱ्या अपंगत्व आणि अशक्तपणामुळे समाजाकडून वाईट वागणूक मिळते. जगण्यासाठी पुरेशा प्रमाणात अन्न धान्य व इतर घटकांची आवश्यकता असते. बाधित व्यक्तींना या गोष्टी मिळवण्यासाठी ही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामाजिक एकाकीपणा येतो. सामाजिक उपक्रमांमध्ये या व्यक्तींना सामील करुन घेण्यात येत नाही.
काही एनटीडी पुढीलप्रमाणे –
बुरुली अल्सर
दुर्बल मायकोबॅक्टेरियलम अल्सेरांसमुळे त्वचेसह हाडांचा संसर्ग होतो.
डेंग्यू
ज्या डासांमुळे फ्लू होतो तो चावला तर डेंग्यू होऊ शकतो. डेंग्यूमुळे ताप चढणे, मळमळणे, उलट्या होणे, त्वचेवर व्रण उठणे, रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे, रक्तदाब कमी होणे किंवा संक्रमित व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
ड्रॅकनकुलिआसिस (गिनी अळी रोग)
दूषित पाण्यामुळे हा रोग होतो.
इचिनोकोकोसिस
या किड्यांचा संसर्ग होऊन रोग होतो. यांची अंडी कुत्रे आणि वन्य प्राण्यांच्या विष्ठेत सापडतात.
मानवी आफ्रिकन ट्रायपानोसोमियासिस ( झोपेचे आजारपण )
टसेट माशांमुळे हा रोग पसरतो. योग्य वेळी निदान झाले नाही तर यामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. मध्यवर्ती मज्जासंस्था या रोगामुळे निकामी होते.
लेशमॅनियसिस
मादी सँडफ्लायच्या चाव्यामुळे हा रोग होतो. शरीरातल्या आतल्या भागांवर या रोगाचा हल्ला होतो. यामुळे चेहऱ्यावर अल्सर, शरीरावर चट्टे आणि अपंगत्व येते.
कुष्ठरोग
हा गुंतागुंतीचा आजार आहे. मुख्यत्वे त्वचा, नसा, श्वसनमार्गाचा भाग आणि डोळ्यांवर याचा परिणाम होतो.
लिम्फॅटिक फिलारिअसिस
डास चावल्यामुळे हा रोग होतो. याचा परिणाम पाय, गुप्तांग यावर होतो.
मायसेटोमा
हा तीव्र त्वचा रोग आहे. तो मुख्यत्वे खालच्या अंगावर हल्ला करतो. त्वचेखालच्या टिशूमध्ये बुरशी होऊन किंवा बॅक्टेरियाची वाढ होऊन हा संसर्ग पसरतो.
ओन्कोसोरसिआसिस
संसर्ग झालेल्या काळ्या माशांच्या चाव्यामुळे हा रोग होतो. या रोगामुळे दृष्टीदोष आणि कायमचे अंधत्व येते.
रेबिज
संसर्ग झालेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे माणसाला हा रोग होतो. हा विषाणूजन्य रोग खूप धोकादायक आहे.
स्किस्टोसोमियासिस
गोगलगायीमधून बाहेर पडलेल्या संसर्गजन्य जंतूंच्या पाण्याचा संसर्ग माणसाला झाला तर हा रोग होतो.
मातीतून संसर्ग होणारा हेल्मिन्थस
मानवी विष्ठेतून मातीत मिसळणाऱ्या जंतूंमुळे हा रोग होतो. यामुळे अनिमिया, व्हिटॅमिन एची कमतरता, कुपोषण, आतड्यात होणारा त्रास आणि शरीराची वाढ नीट न होणे हे परिणाम दिसतात.
ट्रॅकोमा
संसर्ग झालेल्या डोळ्याबरोबर संपर्क, नाकातून किंवा अस्वच्छ वातावरणात हा रोग होतो. यावर उपचार केले नाहीत तर अंधत्व येते.
इतर रोगांमध्ये फास्सीओलियासिस, सिस्टिकेरोसिस, फूडबोर्न ट्रामाटोडायसिस, टॅनिआयसिस आणि न्यूरोसायटिरकोसिस इत्यादींचा समावेश आहे.
उपचार आणि प्रतिबंध
जर निदान वेळेवर झाले तर सर्वच रोगांवर उपचार होऊ शकतात. पण उपचार करण्यात उशीर झाला तर मात्र आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. एनटीडीला आळाही घालता येऊ शकतो. त्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, निर्जंतुकीकरण, स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे. माशा, डास यांच्या प्रजननावर नियंत्रण ठेवल्याने एनटीडी टाळता येईल. त्यासाठी आजूबाजूच्या परिसरात कीटकनाशके फवारणी, डासांची पैदास होऊ नये म्हणून पाणी साठू न देणे आणि प्यायचे पाणी झाकून ठेवणे हे गरजेचे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची १० वर्षांची योजना
एनटीडीच्या २० रोगांना नियंत्रणात ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाकांक्षी योजना आखल्या आहेत. त्यात दर्जेदार आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेचा अभाव असणाऱ्या ठिकाणी लक्ष पुरवणे हे आहे.