कोविड १९ म्हणजे जणू जंगलाला लागलेली आग आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे खूपच कठीण झाले आहे. जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन होते, तरीही जगभरात कोविडचे रुग्ण इतके वाढत आहेत की त्यावर ताबा मिळवणे कठीण जात आहे. त्यात आता भारतातले हवामान बदलत आहे. पावसाळा आल्यामुळे विषाणूजन्य आजारांचे प्रमाणही वाढत आहे.
नॅशनल सेंटर ऑफ डिसिज कंट्रोल ( एनसीडीसी ) च्या मते २०१९ मध्ये ऋतुमानात येणाऱ्या इन्फ्लुएंझा एने ( एच १ एन १ ) भारतात प्रमाण पडणाऱ्यांची संख्या २८७९८ होती आणि १२१८ मृत्यू झाले.
ई टीव्ही भारत सुखीभवच्या टीमने हैदराबादच्या इन्स्टिट्युट ऑफ प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिनचे अधीक्षक, फीव्हर हॉस्पिटलचे एमडी (जनरल मेडिसिन) डॉ. के. शंकर यांच्याशी बातचीत केली. ते म्हणतात, 'डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि पाण्यापासून होणाऱ्या विषाणूजन्य आजारांचा हा हंगाम आहे. हा हंगाम ऑक्टोबरपर्यंत राहील. पण जोपर्यंत सामूहिक प्रतिकार शक्ती विकसित होत नाही, तोपर्यंत कोविड १९ चा परिणाम राहीलच. आणि म्हणूनच प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. अशातच इतर विषाणूजन्य आजार पसरत आहेत म्हणून जास्त सावध राहायला हवे.'
कोविड १९ विषाणूंवर पावसाचा कसा परिणाम होतो ?
ऋतुमानाप्रमाणे होणारे आजार पावसाळ्यात जास्त पसरतात. पण नवीन असलेल्या कोरोना विषाणूवर असाच परिणाम होतो का ? आमचे तज्ज्ञ इंदौरच्या अॅपल रुग्णालयाचे डॉ. संजय के. जैन, एमबीबीएस, एमडी (मेडिसिन) म्हणतात, 'आतापर्यंत आम्ही असे पाहिले आहे की पावसामुळे कोविड १९ पसरत नाही. पण कोविड १९ आणि इतर फ्लूजमध्ये फरक आहे. थंड वारे, पावसाळी किंवा दमट हवामानामुळे नेहमीचे संसर्गजन्य आजार पसरतात. हे विषाणू जेव्हा पसरतात तेव्हा अनेक लोकांना फ्लू होतो. पण कोविड १९ च्या बाबतीत असे होत नाही. या बाबतीत आम्ही स्थिर वक्ररेषा पाहिली आहे.'
'खूप दमटपणा असेल तर विषाणू हवेत दीर्घ काळ राहतो. समजा एखादी व्यक्ती शिंकली किंवा खोकली तर त्यातून उडणारे थेंब हवेत ६ तासापर्यंत राहतात. म्हणून विषाणू टिकून राहण्यामागे तापमान खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच तापमान कमी आणि दमट असते तेव्हा ठराविक विषाणूजन्य आजार जास्त पसरतात.' डॉ. संजय समजावून सांगतात.
विषाणूजन्य संसर्ग कसा पसरतो ?
विषाणूजन्य ताप येण्यामागे हवामानातला बदल हे मुख्य कारण असते. विषाणूजन्य संसर्ग हा एखाद्या आजारी व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकेतून होतो. याशिवाय एखादी व्यक्ती पावसात भिजली तरीही विषाणूंशी संबंध येतो. डॉ. संजय सांगतात, एखादी व्यक्ती पावसात भिजते, तेव्हा तिच्या शरीराचे तापमान अचानक बदलते. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला सर्दी आणि ताप येतो. तसेच आपल्या शरीरातही अनेक विषाणू आणि जिवाणू असतात. ते शरीराला तसा अपाय करत नाहीत. त्यांना कॉम्मेन्सल म्हणतात. पण शरीराच्या तापमानात बदल झाला की मात्र ते कार्यरत होता आणि मग संसर्ग होतो. ’
यावर कसा प्रतिबंध घालायचा ?
इतर विषाणूजन्य संसर्गाबरोबर कोविड १९ सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरत आहे, हे कायम लक्षात ठेवायला हवे. लोकांनी आधीपेक्षा जास्त काळजी घ्यायला हवी. डॉ. संजय यांनी सांगितलेले काही प्रतिबंधात्मक उपाय पुढीलप्रमाणे –
- साबणाने तुमचा हात वारंवार धुवा. धुताना २० सेकंद साबण हाताला चोळा. किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.
- सोशल डिस्टंसिंग राखा. कुणाही व्यक्तीसमोर उभे राहताना ६ फुट अंतर ठेवा आणि गर्दीची ठिकाणे टाळा.
- कुणीही सार्वजनिक ठिकाणी खोकत किंवा शिंकत असेल तर त्याच्यापासून दूर जा.
- मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
- काटेकोरपणे स्वच्छता पाळली पाहिजे.
- तुमच्या शरीराच्या तापमानात अचानक बदल होणार नाही याची काळजी घ्या. पावलात भिजू नये म्हणून सोबत छत्री किंवा रेनकोट ठेवा.
- बाहेर खाणे टाळा. यामुळे घशात संसर्ग होऊ शकतो आणि आतड्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. घरी शिजवलेले आरोग्यदायी अन्नाचे सेवन करा.
- स्वच्छ ठिकाणी झोप काढा. शरीराला आराम देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
- नियमित व्यायाम करा. ध्यान, योग, घरीच व्यायाम या गोष्टी आवश्य करा.
- नियमित वैद्यकीय तपासणी करा. तुमचा मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात ठेवा. आणि तुमची औषधे नियमित घ्या.
डॉ. संजय यांनी कोविड १९ बद्दलही सांगितले. ते म्हणाले, 'गरज नसेल तर शक्यतो घराबाहेर पडू नका. कोविड १९ वर औषधे दिली जातात ती विषाणूंची संख्या कमी करायला. पण यावर अजून उपचार उपलब्ध नाही. औषधे आणि त्याबरोबर लशीच्या चाचण्या सुरू आहेत. लोकांनी जीवनसत्त्वे, पौष्टिक आहार घेऊन, व्यायाम करून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी. या सर्व गोष्टींमुळे आपण या विषाणूला बाहेर ठेवू शकतो.'
'लक्षात असू द्या की ही महामारी संपलेली नाही. आपल्याला कोविड १९ सोबतच जगायचे आहे. त्यासाठी आपल्या सवयी बदलायला हव्यात. जास्तीत जास्त वेळ घरीच राहायला हवे. लवकरच आपण या परिस्थितीवर मात करूच. पण तोपर्यंत लोकांनी सावधगिरी बाळगायला हवी.' डॉ. संजय म्हणाले.
म्हणूनच तुम्ही घरीच राहा. विशेष करून तुम्ही हाय रिस्कमध्ये असाल तर प्रतिबंधात्मक उपायांचे पालन व्हायला हवेच. स्वत:ला सुरक्षित ठेवा. काही लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटण्याऐवजी फोनवर संपर्कात राहा.