हैदराबाद - बालपणात होणाऱ्या एचएलएच (हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस) या जीवघेण्या आजारावरील औषधाचा अभ्यास करण्यासाठी सिनसिनाटी चिल्ड्रन्स या लहान मुलांच्या रुग्णालयात एक ट्रान्सजेनिक अर्थात् जनुकीयदृष्ट्या संशोधित उंदीर विकसित करण्यात आला आहे. कोविड-19 विषाणूच्या महामारीत लोकांचे प्राण वाचविण्यात ही घडामोड महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते.
एचएलएच आजारावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाची (रुक्सॉलिटिनीब) एक लहान क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. याअंतर्गत, कोविड-19 ने गंभीरदृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णांमधील श्वसनसंबंधी व शरीरातील इतर अवयवांमध्ये होणारे प्रज्वलन (दाहकता) नाट्यमय रीतीने कमी करण्यात यश मिळाले आहे. जनुकीय तंत्रज्ञानाच्या साह्याने विकसित करण्यात आलेल्या उंदरांच्या प्रजातीचे संशोधक असलेल्या सिनसिनाटी चिल्ड्रन्स येथील कर्करोगाचे रोगनिदानतज्ज्ञ गँग हुआंग हे या चाचणीत सहकारी अन्वेषकाची (को-इन्व्हेस्टिगेटर) भूमिका पार पाडत आहेत. दुसऱ्या टप्प्यात झालेल्या क्लिनिकल अभ्यासासंदर्भातील माहिती ही जर्नल ऑफ एलर्जी अँड क्लिनिकल इम्युनॉलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अभ्यासात वुहान, चीन येथे 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीदरम्यान गंभीर स्वरुपातील कोविड-19 चे निदान होऊन रुग्णालयात दाखल झालेल्या 43 रुग्णांचा समावेश करण्यात आला. महामारीची सुरुवात वुहानपासून झाल्याचे मानले जाते. वुहान येथील टाँगजी रुग्णालयातील हेमॅटॉलॉजी विभागाचे जिआनफेंग झोऊ, एमडी, पीएचडी, टाँगजी मेडिकल कॉलेज आणि हुआझोंग विज्ञान विद्यापीठ यांच्या नेतृत्वाखाली हा बहुकेंद्रीय अभ्यास पार पडला.
कर्करोग आणि रक्तविषयक आजार संस्थेचा भाग असलेल्या सिनसिनाटी चिल्ड्रन्स एचएलएच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे कार्यरत असणारे श्री हुआंग आणि इतर सहकाऱ्यांबरोबर श्री झोऊ हे अनेक काळापासून काम करीत आहेत.
रुक्सॉलिटिनीबची चिन्हे सकारात्मक..
रुक्सॉलिटिनीब घेणाऱ्या काही रुग्णांची निवड करण्यात आली. त्यांना दररोज 5 मिलीग्रॅम हे दाहकता कमी करणारे औषध देण्यात आले. याशिवाय, त्यांना कोविड-19 साठी देण्यात येणारे नियोजित (स्टँडर्ड ऑफ केअर) उपचार देण्यात आले. त्यानंतर, 21 रुग्णांच्या दुसऱ्या नियंत्रण गटाला प्लॅसिबो आणि नियोजित उपचार देण्यात आले. “रुक्सॉलिटिनीब घेणाऱ्या रुग्णांमध्ये अधिक वेगवान सुधारणा दिसून आली”, असे अभ्यासकांनी आपल्या अहवालात लिहीले आहे.
“रुक्सॉलिटिनीब गटातील रुग्णांमध्ये छातीच्या सीटी चाचणीत लक्षणीय सुधारणा, लिम्फोपेनियातून जलद बरे होणे आणि अनुकूल परिणाम दिसून आले. या गोष्टी भविष्यात अधिक मोठ्या लोकसंख्येवर रुक्सॉलिटिनीबची कार्यक्षमता तपासण्यासाठी माहितीपूर्ण आणि प्रोत्साहनपर ठरल्या.”
रुक्सॉलिटिनीबचे उपचार करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सुधारणा घडून येण्यासाठी लागलेला कालावधी नियंत्रण गटातील रुग्णांच्या तुलनेत कमी होता. संशोधकांना असे आढळून आले की, 90 टक्के रुक्सॉलिटिनीब रुग्णांच्या सीटी स्कॅनमध्ये 14 दिवसांत सुधारणा दिसून आली. नियंत्रण गटातील रुग्णांमध्ये हे प्रमाण 9 टक्के होते. श्वसन यंत्रणेत बिघाड झाल्याने नियंत्रण गटातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, रुक्सॉलिटिनीब देण्यात आलेले सर्व गंभीर आजारी रुग्ण जिवंत राहिले.
या औषधाची पुढे क्लिनिकल चाचणी आवश्यक आहे. तिसऱ्या टप्प्यातील रुक्सकोव्हिड ही अधिक मोठ्या प्रमाणावर होणारी क्लिनिकल चाचणी इनसाईट आणि नोव्हार्टिस यांच्यातर्फे केली जात आहे. याअंतर्गत, कोविड-19 ने गंभीरदृष्ट्या आजारी असलेल्या 400 रुग्णांना हे औषध दिले जाणार आहे, अशी माहिती हुआंग यांनी दिली. अभ्यासातील प्राथमिक निरीक्षणे उन्हाळ्यात प्रसिद्ध होतील अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
“गंभीर स्वरुपाच्या कोविड-19 आजारातील सायटोकिन स्टॉर्म आणि दाहकता शांत करण्यासाठी प्रभावी ठरणारा आम्हाला माहित असलेला हा पहिला उपचार आहे. या औषधाच्या दिवसाला दोन गोळ्या घेणाऱ्या रुग्णांमध्ये विशेष दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत”, असे हुआंग यांनी सांगितले.
“जोपर्यंत आम्ही लोकांना संसर्ग होण्यापासून वाचविण्यात मदत करण्यासाठी पुरेशा प्रमाणात कार्यक्षम लसी विकसित आणि वितरित करीत नाही, तोपर्यंत हे गंभीर आहे.”
‘सायटोकिन स्टॉर्म’चे शमन..
तथाकथित सायटोकिन स्टॉर्ममध्ये, कोविड-19ने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांच्या शरीरात रोगप्रतिकारक यंत्रणेने तयार केलेल्या दाहक पेशींचा पूर येतो. सेकंडरी एचएलएचचा सामना करणाऱ्या लहान मुलांमध्येही हे वैशिष्ट्य आढळून येते. प्राथमिक एचएलएच उपचारांचा परिणाम न झालेल्या रुग्णांमध्ये असे होते. जगभरातील वैज्ञानिक समुदायाबरोबर कोविड-19 वर अभ्यास करण्यात व उपचार शोधण्यात व्यस्त असणाऱ्या हुआंग यांना या दोन्ही आजारांमधील सामाईक क्लिनिकल वैशिष्ट्य लक्षात आले.
त्यांनी असेही निरीक्षण नोंदवले की, कोविड-19ची गंभीर स्वरुपाची लक्षणे आणि प्रयोगशाळेतील ट्रान्सजेनिक उंदरांमध्ये आढळून आलेल्या लक्षणांमध्ये बरेच साम्य आहे. माणसांमध्ये असणाऱ्या सेकंडरी एचएलएचची लक्षणे तपासण्यासाठी या उंदरांची निर्मिती करण्यात आली होती. या प्रिक्लिनिकल प्रयोगशाळा संशोधनातून रुक्सॉलिटिनीब हे औषध सेकंडरी एचएलएचवर उपचार आहे असे शोधण्यात मदत झाली. यासाठी, वुहान, चीन येथील संशोधकांचीदेखील मदत झाली. दाहकता कमी करणारे हे औषध ल्युकेमियासह इतर रक्ताशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.
“मी आमच्या वुहानमधील संशोधन सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि आमची निरीक्षणे त्यांना समजावून सांगितली. त्याचप्रमाणे, कोविड-19ने गंभीर स्वरुपात आजारी असणाऱ्या रुग्णांमधील विविध अवयवांमधील दाहकतेशी संबंधित सायटोकिन स्टॉर्म शांत करण्यासाठी या औषधाची तपासणी करण्याची शिफारस केली”, असे हुआंग म्हणाले.
“हा आजार खुप झपाट्याने पसरत होता आणि लोक मृत्यूमुखी पडत होते. आम्हाला असे वाटले, की सध्या अस्तित्वात असलेले हे औषध लोकांचे प्राण वाचविण्यास उपयुक्त ठरेल. म्हणून, प्रत्येकासाठी प्रभावी लस उपलब्ध होण्यापुर्वी आम्ही हे औषध पुढे करण्यास सुरुवात केली.”
जानेवारीत जगभरातील शास्त्रज्ञांनी या महामारीशी लढा देण्यासाठी उच्च सतर्कता दाखविली म्हणून चीनमधील सहकाऱ्यांच्या मदतीने हे काम कमीत कमी वेळात पूर्ण झाले, असे हुआंग म्हणाले.
काम सुरु असताना, हुआंग आणि चीनमधील संशोधकांना इतर आजारासंबंधीचे अभ्यास आढळून आले, ज्यामध्ये रुक्सॉलिटिनीब हे औषध दाहकतेचे शमन करण्यात यशस्वी झाले आहे. आणि पुढे कोविड-19 रुग्णांची चाचणी करण्यात आली. टाँगजी रुग्णालय, हुआझोंग विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील आणीबाणी संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून जेएसीआय अभ्यासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला.