यवतमाळ - आर्णी तालुक्यातील येरमल हेटी गावात 17 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला करून आरोपी तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गोलू उर्फ अंकुश भारत चव्हाण, असे या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक अशी, की अंकुश चव्हाण याने तरुणीच्या घरी तिचे तोंड दाबून तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. त्यानंतर तो घराचे बाहेरून दार बंद करून फरार झाला. त्यानंतर पाणी विक्रेता करणारा तरूण ज्यावेळी तरूणीच्या घरी गेला आणि त्याने दार उघडले त्यावेळी त्याला तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
याबाबत पाणी विक्रेत्याने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर जखमी तरुणीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले असता, केळझरा तांडा जवळील विहिरीत या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
आरोपीने मुलीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली आहे. जखमी तरुणी पुणे येथे बारावीचे शिक्षण घेत होती. ती होळी सणानिमित्त गावी आली होती. या प्रकरणी आर्णी पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे.