यवतमाळ - यवतमाळ विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे सुमित बाजोरीया यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे निष्ठावंत माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांनी नामांकन दाखल करत बंड केले होते. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली होती. मात्र, उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीनंतर मुनगीनवार यांनी माघार घेतल्याने दुष्यंत चतुर्वेदींचा मार्ग सुकर झाला आहे.
नामांकन मागे घेण्याच्या दिवशी सुद्धा बाळासाहेब मुनगीनवार यांनी उमेदवारी कायम ठेवून यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक व्यक्तीला प्रतिनिधित्व मिळावे, अशी ठोस भूमिका कायम ठेवली होती. मुनगीनवार यांची ताकद पाहता शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या गोटात यामुळे अस्थिरता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांना थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
राज्याचे वनमंत्री तसेच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शिवसेना नेते मिलींद नार्वेकर यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. त्यानंतर मुनगीनवार यांना मातोश्रीवर बोलवून उमेदवारी मागे घेण्यासाठी सांगण्यात आले. मुंबईला जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना तिथे थांबण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे आता शिवसेनेचे विधानपरिषदचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची बाजू भक्कम झाल्याचे बोलले जात आहे.
माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार हे 33 वर्षापासून शिवसेनेत आहेत. 2022 मध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक उमेदवारांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्याचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीणवार यांनी सांगितले. या निवडणुकीचा कार्यकाळ 2022 पर्यंत असून, 489 मतदार आहेत. येथे निवडून येण्यासाठी पहिल्या क्रमांकाच्या 245 मतांची गरज आहे.