यवतमाळ - जिल्ह्यात सुरुवातीला रेमडेसिवीर इंजेक्शनचा काही जणांनी साठा केला होता. त्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र आता मागणी तसा पुरवठा या पद्धतीने रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. खासगी रुग्णालये व शासकीय रुग्णालयात मिळून 500 इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे जिल्हाधिकारी अमोल येगडे यांनी म्हटले आहे.
खासगी रुग्णालयात अवश्यकतेनुसार रेमडेसिवीरचा पुरवठा
जिल्ह्यात अठरा खासगी कोविड रुग्णालय आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये मागणीनुसार इंजेक्शनचा पुरवठा केल्या जात आहे. यासाठी वितरण प्रणाली व तपासणी ही वेळोवेळी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ज्या रुग्णालयामध्ये खरोखरच रेमडेसिवीरची आवश्यकता आहे, त्यांनाच इंजेक्शन देण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
दोन दिवसांत आणखी इंजेक्शन उपलब्ध होणार
शासकीय रुग्णालयात रेमडेसिवीरचा साठा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयात काही प्रमाणात तुटवडा जाणवतो आहे. मात्र येत्या दोन दिवसांमध्ये इजेक्शनचा नवीन साठा उपलब्ध होत असल्याने तो दूर करण्यात येईल. यवतमाळ शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये साठा करून ठेवण्यात आला होता, त्या ठिकाणी धाड घालून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हा साठा ताब्यात घेऊन इतर हॉस्पिटलला वितरित करण्यात आला आहे. अशा पद्धतीने साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न आणि औषध विभागाला देण्यात आल्याची माहिती देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - राज्य सरकारने नियमबाह्य पद्धतीने खास लोकांचे लसीकरण केले, भाजपचा आरोप