यवतमाळ- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित होताच यवतमाळमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला. शहरातील दत्त चौकात आतिषबाजी करण्यात आल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मोठ्या संख्येत शहर शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईला रवाना होत आहे.
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र महाविकास आघाडीची सरकार स्थापन होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे सर्व संकट दूर करण्याचा प्रयत्न होईल, अशी शिवसैनिकांना आशा आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, अशी शिवसेनेची मागणी होती. आता उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याने संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा लवकरच होईल, असा शिवसैनिकांना ठाम विश्वास आहे.
त्यामुळे शहर शिवसैनिकांकडून आज दत्त चौकात आतिषबाजी करण्यात आली. 'उद्धवजी ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' तसेच 'जय भवानी जय शिवाजी' च्या घोषणांनी परिसर दणाणून गेले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, तालुका प्रमुख संजय रंगे, गिरीष व्यास, व्यापारी आघाडीचे प्रमुख प्रविन निमोदीया, यांच्यासह मोठया संख्येत शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा- राज्यपालांच्या हस्ते बिटरगावचा सन्मान; घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुरस्कार