यवतमाळ - जिल्ह्यातील शिरपूर येथे पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी एका पीकअप व्हॅनला अडवले. त्यावेळी तपासणी दरम्यान पोलिसांना या गाडीत 250 देशी दारूच्या पेट्या आढळल्या. मात्र, या गाडीचा वाहतूक मार्ग पाहून पोलिसही चक्रावले. ही गाडी यवतमाळहून नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे जात होती. उमरेडला जाताना केवळ एक बायपास रस्ता असून तो 165 किलोमीटर इतका आहे. परंतु, ही गाडी लांबचा पल्ला टाकत तब्बल 235 किलोमीटरचा प्रवास करत चंद्रपूर जिल्ह्यातून यवतमाळमध्ये आली होती.
हेही वाचा... दिव्यांग कोरोनाबाधित रुग्णांची व्यवस्था करणारे महाराष्ट्रातील 'हे' आहे पहिले रुग्णालय
दारूची वाहतूक करताना शक्यतो तस्कर जवळचा मार्ग स्विकारतात. तसेच आवश्यकता नसेल तर दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातून प्रवास टाळतात. ही गृहीतके पोलिसांनाही माहिती आहेत. मात्र, याच गोष्टींना फाटा देत या दारु तस्करांनी तब्बल 235 किलोमीटर लांबचा प्रवास करणे पसंत केले.
शिरपूर येथे पोलिसांनी गाडी अडवली तेव्हा गाडीचा लांबचा पल्ला पाहून पोलीस चक्रावले. त्यांना गाडीने इतका लांबचा मार्ग का स्विकारला असा प्रश्न पडला. तसेच दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातून गाडी का जात असावी, याबाबत संशय आला. त्यामुळे शिरपूर पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वाहतूक परवाना योग्य असल्याची विचारणा केली.
यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेल्या चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. यवतमाळ जिल्ह्यातून या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर मद्य तस्करी होते, हे उघड सत्य आहे. यासाठी दारू विक्रेते वेगवेगळे उपाय योजतात. त्यामुळे आता ही दारू नागपूर जिल्ह्यातील उमरेड वगैरे भागात न नेता चंद्रपुर येथे घेऊन चालले होते का, याचा उलगडा करण्याची जबाबदारी पोलिसांकडे आहे.