यवतमाळ - पैनगंगा अभयारण्याला लागून असलेल्या बंदी भागात पट्टेदार वाघांचे दर्शन झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरबी आणि कोरटा या परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याचे वनविभागाच्या पथकाला गस्त घालत दिसून आले. माहितीनुसार, त्यामधील एक नर तर दुसरी मादी आहे.
पाण्यासाठी वस्तीकडे धाव -
वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाकडून दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागू नये तसेच त्यांना जंगलातच पाणी पिण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी पाणवठ्याची निर्मिती केली जाते. मात्र, उन्हाळा लागला की वन्यप्राणी पाण्याच्या शोधात वस्त्याकडे धाव घेत असतात. यातूनच बरेच वेळा माणूस आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष होत असतांना दिसून येतो. अभयारण्याच्या बंदी भागातील कोर्टा, खरबी या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती आहे. या शेतीच्या भरवशावर तेथील लोक आपल्या कुटुंबाची देखभाल करतात. मात्र, आता पट्टेदार वाघांचा मुक्त संचारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाण्याच्या शोधत वाघ वस्त्याकडे येत असल्याने वन विभागातील पाणवठ्याच्या कामाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा - धक्कादायक! ऐन कोरोनाच्या काळात कळंबमध्ये बनावट औषधांची विक्री
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन -
पैनगंगा अभयारण्यात सध्या जंगली प्राण्याचा वावर वाढला आहे. वाघ तसेच बिबट्यांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील जेवली येथे अंगणात झोपलेल्या मुलावर वाघाने हल्ला केला होता. तर खरबी रेंजमध्ये या दोन वाघाचे दर्शन झाल्याने अभयारण्यातील नागरिक घाबरले आहे. नागरिकांनी सतर्क राहून जंगलात गुरे घेऊन तसेच लाकडे आणण्यासाठी जाऊ नये, असे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - बुलडाण्यात संपूर्ण लॉकडाऊन नाही, निर्बंधांसह दुकाने राहतील सुरू