यवतमाळ - जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील लाखरायाजी येथील तलाठ्याला लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. अंशुमन निकम असे त्या तलाठ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
अंशुमन निकम यांनी सागवानी झाडाची नोंद करण्यासाठी तक्रारदारास १ हजार रुपयाची मागणी केली होती. संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. मात्र, त्या तलाठ्याला संशय आल्याने त्याने त्यावेळी लाच स्विकारली नाही. मात्र, लाचेसंदर्भात तक्रारदारासोबतचे बोलणे मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले होते. त्यावरून तलाठी निकम यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपाधीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.