यवतमाळ - मुंबई येथील नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील रॅगिंगला कंटाळून डॉ.पायल तडवी यांनी आत्महत्या केली होती. त्याविरोधात बुधवारी ट्रायबल मेडिकोज असोसिएशन, डॉक्टर आंबेडकर मेडिकोज असोसिएशन यवतमाळ यांच्यावतीने डॉ. अरविंद कुडमेथे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय महाविद्यालय निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी अरविंद कुडमेथे यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्यपालांना निवेदन देण्यात आले. तर वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांना निवेदन देण्यात आले.
हा कॅन्डल मार्च वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. या ठिकाणी डॉ. पायल तडवी यांना श्रद्धांजली वाहून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.
यावेळी डॉ.अरविंद कुडमेथे, डॉ. बाबा येलके, आमदार राजू तोडसाम, डॉ. चंद्रशेखर धुर्वे, डॉ. विवेक गुजर, डॉ. रोहित सलामे, डॉ. अक्षय मेंढे, निरज मेश्राम, डॉ. प्रवीण उईके, डॉ. शेखर घोडेस्वार आदि उपस्थित होते.