यवतमाळ - राज्यात 2011 पासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेदची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याकरिता शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र हा उमेद प्रकल्प बाह्य संस्थेला देण्याचा घाट महाविकास आघाडी शासनाने केला आहे. त्यामुळे ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे करार संपले त्यांना कामावरून कमी न करता पुन्हा रुजू करावे, यासाठी स्वामिनीच्यावतीने आज मूक मोर्चा काढण्यात आला.
राज्यात चार लाख 79 हजार 174 समूह स्थापन करण्यात आले असून यामध्ये 49 लाख 44 हजार 656 कुटूंब या कर्मचाऱ्यांशी जोडलेली आहेत. मात्र, शासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांची सेवा करार संपुष्टात आणले. या उमेद प्रकल्प खासगी करण्याचा घाट सुरू केला आहे. गावागावांत जनजागृती करून महिलांना सक्षम व आत्मनिर्भर करणारे कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. या कोरोनाच्या भयंकर काळात त्यांच्या कुटुंबाचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहेत. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे गावातील सर्व बचत गटाची कामे थांबली आहे. कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी स्वामिनी दारू मुक्ती आंदोलनाचे मुख्य संयोजक महेश पवार यांच्यावतीने आज शहरातील विविध भागातून मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्हाभरातील हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.