यवतमाळ - दिग्रस तालुक्यात मोख गावातील स्वस्त धान्य दुकानातील गहू धान्य बाजारात विक्रीसाठी आणले असल्याची शंका पुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. पुरवठा विभागाने हे धान्य जप्त केले असून तपासणीसाठी पाठवले आहे. याप्रकरणी स्वस्त धान्य दुकान मालक दोषी आढळ्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिग्रसचे नायब तहसीलदार जी. एम. राठोड यांनी दिली आहे.
गावातील अज्ञात व्यक्तीने स्वस्त धान्य दुकानातील गहू विक्रीसाठी बाजारात नेल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली होती. नायब तहसीलदार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची पाहणी करून दोन ढिगाऱ्यांमधून गव्हाचे नमुने घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा - जप्त केलेल्या 39 लाखाच्या दारूसाठ्यावर पोलिसांनी चालवला बुलडोजर
पंचनाम्यादरम्यान नायब तहसिलदारांनी 9 क्विंटल गहू जप्त केले आहेत. राशन दुकान मालक शेतकरी असल्याने, हे गहू त्यांच्या शेतातील आहेत की राशन दुकानातील, हे तपासणी अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.