यवतमाळ - कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका मजूर वर्गाला बसला आहे. इतर प्रांतातील बरेच मजूर आणि नागरिक यवतमाळ जिल्ह्यात अडकलेले आहेत. त्यांच्या राहण्याची खाण्याची सोय प्रशासनाने जिल्ह्यातील ३७ निवारागृहात केली आहे. कोरोनामुळे ओढावलेल्या या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी निवारागृहातील नागरिकांना योगा व प्राथनेच्या माध्यमातून मानसिकरित्या सक्षम करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमध्ये अडकेलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात एकूण ३७ तात्पुरते निवारे उभारले आहेत. परप्रांतीय आणि बाहेर जिल्ह्यातील एकूण १०८५ नागरिकांची सोय प्रशासनाने या निवारागृहात केली आहे.
केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथे असलेल्या रेड्डी कॉन्व्हेंटमध्ये थांबलेल्या नागरिकांच्या प्रत्येक खोलीसमोर चप्पल स्टँड ठेवण्यात आले आहे. येथे खेळण्याकरीता प्रशस्त मैदान उपलब्ध आहे. याशिवाय बातम्या बघण्याकरीता प्रोजेक्टरची सुविधा, जेवणाकरीता स्वतंत्र भोजन कक्ष, मोबाईलकरीता वायफाय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या निवारागृहात थांबलेले नागरिक खेळ व मनोरंजनासोबतच आध्यात्माचा आनंदसुध्दा घेत आहेत. सायंकाळी ६ च्या दरम्यान योगा, मेडिटेशन नागरिकांकडून करून घेतले जात आहे. तसेच ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ ही प्रार्थनासुध्दा घेण्यात येते. त्यामुळे येथे थांबलेल्या नागरिकांना आपुलकीचा आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.