यवतमाळ - जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालये हे रुग्णांकडून मनमानी बील घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयात ऑडीटरची नियुक्ती केली आहे. या ऑडीटरांनी बिलांच्या तपासण्या करून, जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार यवतमाळ शहरातील सहा खासगी कोविड रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये धवणे हॉस्पीटल, यवतमाळ कोव्हीड केअर सेंटर, उजवणे हॉस्पीटल, क्रिटीकेअर हॉस्पीटल, राठोड इन्टेंसिव्ह केअर युनीट आणि महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचा समावेश आहे.
दोन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश
रुग्णालयांना नोटीस मिळाल्यापासून 48 तासांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी दिले आहे. रुग्णालयांचे उत्तर समाधानकारक नसल्यास अशा रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील वऱ्हाडे यांनी म्हटले आहे.
ऑडीटरचे असणार रुग्णालयांवर लक्ष
जिल्ह्यातील 24 खासगी रुग्णालयात ऑडीटर नेमण्यात आले आहेत. रुग्णालयातील उपलब्ध बेड संख्या, ॲक्टीव्ह रुग्ण, पॉझिटिव्ह रुग्ण, सुटी देण्यात आलेले रुग्ण यांची अद्ययावत माहिती ठेवणे, कोरोनाबाधित रुग्णांकडून योग्य शुक्ल आकारणी होते किंवा नाही याची पडताळणी करणे, तसेच परिपत्रकानुसार शुल्क आकारणी होत नसल्यास एकंदरीत बिलाची तपासणी करून, शुल्क आकारणी निश्चित करणे. रुग्णालयातील कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णांचे देयके तपासल्याशिवाय त्यांना सुटी देण्यात येणार नाही याबाबत खात्री करणे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून जादा रक्कम घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास, तेथेच त्यांच्या तक्रारींचे निरसन करणे, त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करणे, याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा - कोरोनावरील लसीचे उत्पादन आपल्याकडे, तरीही लस महाग कशी - प्रकाश आंबेडकर