यवतमाळ - आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेला आणि सुरुवातीला पॉझिटिव्ह आलेला कोरोनाचा रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला शनिवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात चार जण नव्याने पॉझिटिव्ह आल्यामुळे ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 67 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गत 24 तासात 134 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
शनिवारी नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यात दारव्हा येथील एक महिला, वणी येथील महिला आणि यवतमाळ शहरातील एक महिला व एक पुरुष आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 64 होती. एकाला सुट्टी झाल्यामुळे ही संख्या 63 वर आली. मात्र, नव्याने चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 67 वर पोहोचला आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 138 रिपोर्ट प्राप्त झाले. यात चार जण पॉझिटिव्ह तर 134 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये सद्यस्थितीत 86 जण भरती आहे.
जिल्ह्यात सुरुवातीपासून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 266 झाली आहे. यापैकी तब्बल 191 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात आठ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी 32 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 4 हजार 447 नमुने तपासणीकरीता पाठवले असून, यापैकी 4 हजार 392 अहवाल मिळाले असून, 55 अहवाल येणे बाकी आहेत. आतापर्यंत 4 हजार 126 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.