यवतमाळ - विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात नेते दुसऱ्या पक्षात गेले होते. मात्र आता पक्षांतर केलेलेच काहीजण आज आमच्या सोबत पक्षात पुन्हा येण्यासाठी संपर्क साधत आहेत. ही संख्या मोठी असून त्यासोबत अपक्षही सोबतीला असल्याचा, धक्कादायक खुलासा काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा... आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन, भाजपला शिवसेनेसह इतर विरोधकांचा करावा लागणार 'सामना'
काँग्रेस अजूनही 'वेट अँड वॉच'च्या भुमिकेत
राज्यात सरकार स्थापनेबाबत अगदी सावधपूर्ण पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये वितुष्ट आल्याने त्यांचे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या आम्ही तीन पक्षांनी एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. पण वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येत असतील तर किमान समान कार्यक्रमाबद्दल स्पष्टता आल्यानंतरच निर्णय घेता येईल, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा... आज दिल्लीमध्ये पवार-गांधी भेट, सत्तास्थापनेबाबत चर्चा
भाजपच्या सत्ता स्थापन करण्याविषयी बोलताना माणिकराव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला. जयंत पाटील यांनी भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे म्हटल्यानंतर भीतीपोटी भाजप सत्तास्थापनेचा दावा करत आहे. पण जर भाजपकडे संख्याबळ असेल, तर त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करावा, असे आवाहन त्यांनी भाजपला दिले आहे. भाजपचेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आपले आमदार फुटून आघाडीसोबत जाऊ नयेत म्हणून सत्ता भाजपची येणार, असे भीतीपोटी बोलत असल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे.