यवतमाळ : मायावतींनी जरी नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत, असा सवाल केला तरी मायावती ह्या दलित नाहीत असं मी म्हणणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले. नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे आहेत. देशाला पहिल्यांदा ओबीसी पंतप्रधान मिळाला आहे. त्यामुळे मायावतींच्या आरोपात तथ्य नसल्याचेही आठवले यांनी म्हटले.
मंडळ कमिशन मध्ये जी जात येते त्या जातीत नरेंद्र मोदी येतात. हिंदू दहशतवाद, माओवाद, मुस्लिम दहशतवाद, नक्षलवाद या सगळ्या वादाला माझा विरोध असून मी फक्त आंबेडकरवाद मानतो. त्याला माझा पाठिंबा आहे. आंबेडकरवाद म्हणजे शांती आहे. हिंसक वादाला माझा विरोध असून आंबेडकरवाद जातीपातीला जोडणारा आहे, असेही आठवले यांनी सांगितले.
1984 च्या दंगलीत इंदिरा गांधींची हत्या सुरक्षा रक्षकाने केली होती. त्यानंतर अमानुष पद्धतीने शीख बांधवांवर दिल्लीत हल्ले झाले. हजारो शीख बांधवांची हत्या करण्यात आली. ती घटना गंभीर होती. सॅम पित्रोदांच्या वक्तव्याशी सहमत नसून 1984 च्या दंगली कोणी विसरू शकत नसल्याचेही आठवले यांनी सांगितले.