यवतमाळ - जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रच्या कापशी कोपरी केंद्रावर पोलिओ ऐवजी सॅनिटायझरचा डोस पाजल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावून प्रकरणाचा अहवाल मागविला आहे. या पत्रामध्ये तीन दिवसात या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने घेतली आहे.
घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणादरम्यान 12 बालकांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजल्याची घटना घडली होती. या 12 बालकांना यवतमाळच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुरवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल केले होते.
तिघांचे निलंबन-
डॉक्टरांचा हलगर्जीपणा निष्पाप बालकांच्या जीवावर बेतला असून या प्रकरणी केंद्रावरील आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी या तिघांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तत्काळ निलंबित केले आहे. तर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
दोन सदस्यीय समिती गठीत -
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी डॉ. ढोले आणि डॉ. पी. एस. चव्हाण अशी दोन सदस्यीय समिती नेमली असून वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर सीएचओ डॉ. अमोल गावंडे, आशावर्कर संगीता मसराम, अंगणवाडी सेविका सविता पुसनाके यांची सेवा समाप्ती कारवाई आली आहे. चौकशी अहवाल लवकरच येणार असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा - पोलिओची लस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात गेला सूक्ष्म प्लॅस्टिकचा तुकडा, सोलापूर जिल्ह्यातील घटना
अध्यक्ष, आरोग्य सभापतींनी घेतली भेट-
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कलिंदा पवार आणि आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांनी बालकांची भेट घेतली. पोलिओ समजून सॅनिटायझर पाजणे हे हलगर्जीपणाचा कळस आहे. तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. दोन वैद्यकीय अधिकारी यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अहवाल येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच मुलांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याची माहिती मिळताच तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली आणि यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईचे निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कारवाई करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले.
सोलापूरमध्येही डोस पाजताना झाकण बाळाच्या तोंडात गेले -
दरम्यान, आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यातही समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पोलिओचा लस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात सूक्ष्म प्लॅस्टिकचा तुकडा गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
भाळवणी येथील बाबा व माधुरी बुरांडे आपल्या एका वर्षाच्या बाळाला घेऊन पोलिओचा लस देण्यासाठी भाळवणी प्राथमिक केंद्रावर आले होते. लस देण्याची मोहीम सुरू असताना महिला कर्मचारी लस लांबूनच बाळांच्या तोंडात टाकत होते. त्यातूनच बुरांडे यांच्या लहान बाळाला तोंडात टाकत असताना, प्लास्टिकला सूक्ष्म तुकडा वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाच्या तोंडात गेला. बुरांडे पती-पत्नी एक वर्षाच्या लहान मुलाला घरी घेऊन गेले असता. घरी गेल्यानंतर बाळाला त्रास होऊ लागला.
हेही वाचा- 'हिंदूंसंबंधी आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या शर्जील उस्मानीवर कारवाई करून अद्दल घडवा'