यवतमाळ - गावात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या तस्करांना विरोध केल्याने दारूविक्रेत्यांनी महिलांवर हल्ला करत धुमाकूळ घातल्याची घटना वणी तालुक्यातील कुरई गावात घडली. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. अवैध दारू विक्रीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याने महिला दिनी ढाकोरी गावातील महिला दारूविक्रेत्यांविरुद्ध पोलीस तक्रार देण्यासाठी निघाल्या. यावेळी कुरई गावाजवळ अवैध दारू विक्रेत्यांच्या टोळीने या महिलांवर हल्ला चढवला. यात एका महिलेला गंभीर दुखापत झाली, तर अन्य ३ महिला जखमी झाल्या आहेत.
या चकमकीत दारूविक्रेत्यांची एक मोटरसायकल पेटवण्यात आली. दरम्यान, शिरपूर पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोहोचल्याने दारू विक्रेत्यांनी पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक केली आणि पोलिसांचे वाहन पेटवले. यात १ पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर वणी येथील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमाव पांगवला. शिरपूर आणि वणी पोलीस स्टेशन हद्दीतून दारूबंदी असलेल्या चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दारू तस्करी तर होतेच. शिवाय परिसरातील गावातही दारूविक्री वाढल्याने सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे.
पोलिसांच्या आशिर्वादानेच दारूविक्री सोबतच अवैध धंदे वणी परिसरात वाढल्याने परिस्थिती स्फोटक बनलेली आहे. त्यामुळे या अवैध प्रकारांना खतपाणी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या प्रमुखावरच कारवाईची मागणी महिलांनी केली आहे. दारू विक्रेते सत्ताधारी भाजप आमदारामुळे निर्ढावले असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुखासह ग्रामस्थांनी केला आहे. यवतमाळ पोलिसांची प्रतिमा एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांनी मलीन झाली असून खाकी वर्दीतील वादग्रस्त पोलिसांना मात्र अभय देण्याचे प्रकार सुरू आहेत.