यवतमाळ : जिल्हात काल सायंकाळ पासून सुरु असलेल्या संततधार पावसाने ( Heavy Rains In Yavatmal ) वर्धा व रामगंगा ( Yavatmal Ramganga River ) नद्यांना व नाल्यांना प्रचंड पूर आला. यामुळे वरुड जहांगीर, नागठाना, गुजरी, सावंगी, झाडगाव, रामगँगा, एकबुर्जी, भांब, रावेरी, चहांद, पिंपळखुटी गावात पुराचे पाणी शिरले आहे. संपूर्ण शेतीक्षेत्र पाण्याखाली आल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेती साहित्य, बैलगाडी, लाकडी वखर, नांगर पुरात वाहून गेले आहे. अनेक जनावरे पुराच्या पाण्यात अडकली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांनी शाळांचा आसरा घेतला आहे.
झाडगाव येथील १०० वर कुटुंब सुरक्षित स्थळी हलविले - राळेगाव तालुक्यातील झाडगावला चोहोबाजुंनी पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने १०० हुन अधिक कुटुंबियांना शाळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे झाडगाव जलमय झाले आहे. नंदिनी नदीवर वरुड या गावाजवळ लघु प्रकल्प आहेत. रात्रीपासून सुरू असलेल्या पाण्यामुळे या प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने ओव्हर फ्लो होऊन यातील पाणी झाडगाव या गावांमध्ये जाऊन जवळपास शंभर एक घरात शिरले आहे. त्यामुळे संसारपयोगी साहित्यासह अन्नधान्य भिजल्याने हे कुटुंबीय उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांचे शेतीपयोगी साहित्य वाहून गेले असून शेती पिके पाण्यात बुडून सडली आहे. याठिकाणी प्रशासनाने तातडीने मदतकार्य करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
रामतीर्थ पुलावर पाणी - वर्धा नदीवरील रामथीर्थ गावाजवळील पूल पाण्याखाली आला आहे. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याला जोडणारा हा पूल असून तो पाण्याखाली आला आहे. पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. राळेगाव पासून 10 किलोमीटर अंतरावर रामतीर्थ गावाजवळ हा पूल आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचे 18 दरवाजे उघडल्याने वर्धा नदीला पूर आला आहे. नदीवरून कुणी वाहतूक करू नये यासाठी राळेगाव पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हेही वाचा : Indore ST Bus Accident: एसटी अपघात बचाव कार्य वेगाने सुरू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस