यवतमाळ - पूर्णत्वास येत असलेल्या खर्डा प्रकल्पाचे काम थांबवण्यात येऊन, हा प्रकल्प रद्द करावा, असे पत्र पालकमंत्री मदन येरावार यांनी शासनाला पाठवले आहे. त्यामुळे विकासाच्या गोष्टी करणारे भाजपचे पालकमंत्री मदन येरावार हे विकासाच्याविरोधात तर नाही ना? असाही प्रश्न या भागातील शेतकर्यांना पडलेला आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी तिरंगा चौकात धरणे आंदोलन केले.
वास्तवात खर्डा प्रकल्प झाल्यास आठ ते दहा गावांना सिंचनाची सुविधा होणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळणार होता. या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहेत. ठेकेदारांपासून तर इतर सर्व बिले मंजूर होऊन त्यांना देण्यात आली आणि या शेवटच्या टप्प्यावर हा प्रकल्प रद्द व्हावा म्हणजे भाजप शासन हे शेतकऱ्यांच्याविरोधी आणि विकासाच्याविरोधी असल्याचा आरोप माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केला आहे. महाराष्ट्रातील असा एकमेव प्रकल्प आहे की येथे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन हा प्रकल्प व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता.
खर्डा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण न झाल्याने खर्डा, गवंडी, किन्ही, गोंधळी, फतियाबाद, मुरादाबाद, विरखेड व वाटखेड ही गावे सिंचनापासून वंचित राहणार आहेत. या प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी तिरंगा चौकात खर्डा मध्यम प्रकल्प संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. बेंबळा प्रकल्प पूर्ण झाला. त्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू झाला. परंतु, त्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची निर्मिती न झाल्याने नदीच्या डाव्या बाजूला असलेली अनेक गावे सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. पावसाचे पाणी अवेळी व अत्यंत कमी येत असल्याने शेतीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱयांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी या प्रकल्पाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. या मागणीसाठी संघर्ष समितीने तिरंगा चौकात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, भय्यासाहेब देशमुख, डॉ. रमेश महानूर, नरेंद्र कोवे, श्रीकांत कापसे, अतुल राऊत यांच्यासह खर्डा मध्यम प्रकल्प संघर्ष समितीचे पदाधिकारी सहभागी होते.