यवतमाळ - जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे घडली. मृत बैलजोडी वासुदेव पाल या शेतकऱ्याची आहे.
हेही वाचा - यवतमाळ : पुसदमध्ये इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कुठे तुरळक, तर कुठे मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. अशातच शेतामधील विद्युत तारावर झाड कोसळल्याने
ही तार जमिनीवर पडून होती. या तारेतून विद्युत प्रवाह सुरू होता. शेतकऱ्याने सकाळी बैल चरण्यासाठी सोडली असता त्यांना खाली पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाला. यात दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. शेतकऱ्याचे ऐन खरिप हंगामात एक लाखाचे नुकसान झाले असून आता हंगामातील कामे कशी करावी? असा प्रश्न शेतकरी वासुदेव पाल यांना पडला आहे.
पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जिवंत तारा पडल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेक ठिकाणी जिवंत तारा लोंबकळतही पडलेल्या आहेत. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी महावितरणने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.
हेही वाचा - यवतमाळमध्ये लहान मुलांसह म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डाचे नियोजन