बुलडाणा - लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गाव महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे 25 एप्रिलपासून अंधारात आहे. गेल्या चार दिवसांपासून गावाला विद्युत पुरवठा करणारी डीपी जाळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या संदर्भात गावकरी महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गुरुवारी (29 एप्रिल) गेले असता, कार्यालय बंद होते. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी कार्यालयाच्या दारावर निवेदन चिटकवून बेशरमाचे फुल ठेवुन अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला आहे.
विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक घराबाहेर
कोरोनाची दाहकता लक्षात घेता राज्यसरकार ने 14 एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. अशात सर्व नागरिक घरामध्ये थांबत आहेत, मात्र चोरपांग्रा या गावात गेल्या चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नाईलाजाने नागरिक गर्मीमुळे बाहेर निघत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन होत आहे.
महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे गावकरी हैराण
यासंदर्भात नागरिकांनी वेळोवेळी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना कळवले. मात्र बीबी येथील महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे डीपी दुरुस्ती करण्यात आली नाही. सरकारने लॉकडाऊन काळात पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर महावितरण विभाग हा अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असतांना देखील बीबी येथील कार्यालयात एकही कर्मचारी अधिकारी उपस्थित नाही. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी कार्यालय बंद असल्याने दरवाज्यावर आपले निवेदन चिटकवून, त्यावर बेशरमाचे फुल ठेवत निषेध व्यक्त केला आहे. गावातील विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी गावकरी करत आहेत.
हेही वाचा - गोकुळ निवडणूक : मतदानाला सुरुवात; अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क