यवतमाळ - आज देशात कोरोना सोबतच आपण एक संक्रमण परिस्थितीतून जात आहोत. देशात संविधानाला छेद देऊन कारभार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो प्रयत्न आम्ही कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला आहे. जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने संविधान वाटप प्रसंगी ते बोलत होते.
'माय भिमाई माऊली जशी आंब्याची सावली ती राहिली उन्हात उभी आणि आम्हा देई सावली' असे हे संविधान देशामध्ये आज लोकांच्या देवघरात आणि मनात सुद्धा संविधान असायलाच हवे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थाच्या वतीने जिल्ह्यातील 10 हजार नागरिकांना मोफत संविधान पुस्तिकेत वाटप केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते नागरिकांना संविधान पुस्तिकेचे मोफत वाटप करण्यात आले. संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना बळकटी द्यायची आहे, असेही पालकमंत्री राठोड यांनी प्रसंगी सांगितले.