यवतमाळ - जन्मदात्या पित्याने मुलीवर वारंवार अत्याचार करून गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात २५ एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली. पोलीस घटनास्थळावर वेळीच पोहोचल्याने नरबळीचा डाव ( Human sacrifice Babhulgaon ) उधळला गेला. या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले असून, या घटनेचा सर्व स्तरावरून संताप व्यक्त होत आहे. वाल्मिक रमेश वानखेडे (३३), विनोद नारायण चुनारकर (४२), दीपक मनोहर श्रीरामे (३१), आकाश शत्रूघन धनकसार (३४), माधुरी विजय ठाकूर (३०), माया प्रकाश संगमनेरकर (३५) सर्व रा. राळेगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
असा आहे संपूर्ण प्रकार : बाभूळगाव तालुक्यातील तरुणी यवतमाळात काकाकडे शिक्षणासाठी राहण्याकरिता गेली होती. दहावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथे काकाकडे राहूनच पूर्ण केले. अकरावी व बारावीचे शिक्षण अकोला येथे केले. सध्या औरंगाबाद येथे बी फार्मसीचे पहिल्या वर्षाचे शिक्षण तरुणी घेत आहे. सुट्ट्या असल्या की, तरुणी गावाकडे नेहमीच येत होती. वडिल शेती काम करतात. तसेच ते गुप्तधन मिळण्याकरिता मांत्रिकाला बोलावून पुजापाठ करत होते. आई सुमारे तीन वर्षांपासून आजारी असल्याने ती काहीही कामधंदा करत नाही. तरुणी १३ वर्षांची असताना शाळेला सुट्ट्या असल्या की, यवतमाळ येथून घरी येत होती. त्यावेळी वडिल वाईट उद्देशाने कोठेही हात लावत होते. या कृत्याबद्दल तरुणी आईला सांगत होती. त्यावेळी आईने वडिल तुझे लाड करतात, असे सांगितले. परंतु वडिलांकडून वारंवार शरीराला हात लावणे सुरूच होते. त्यानंतर तरुणी एकदा सुट्टीवर घरी आली असता वडिलांनी झोपेत असताना लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीचे गुप्तांग दुखत असल्याने तिने आईला सांगितले. यावेळी आईने तरुणीला मासिक पाळी येत असेल, असे सांगितले. त्यामुळे तिने दुखण्याकडे दुर्लक्ष केले. वडिल आईला खूप मारहाण करत असायचे. त्यामुळे आई वडिलांना घाबरत होती. त्यानंतर तरुणी जेव्हा-जेव्हा सुट्टीवर घरी यायची, तेव्हा-तेव्हा वडिल जबरदस्तीने शारीरिक संबंध करत होते. तरुणीने विरोध केला असता धमकी दिली. या काळात पित्याने मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध केले. त्यानंतर तरुणी काकाकडे यवतमाळला निघून आली.
तरुणी जानेवारी २०२२ पासून औरंगाबाद येथे शिक्षणासाठी राहत आहे. १५ दिवसांपूर्वी प्रकृती ठिक नसल्यामुळे तरुणी औरंगाबाद येथून घरी आली. त्यावेळी आईची प्रकृती बिघडल्याने तिला यवतमाळ येथे भरती करण्यात आले. वडिल दवाखान्यातच राहत होते. तरुणी लहान बहिणीसह घरी होती. आठ दिवसांपूर्वी आई दवाखान्यातून घरी आली. दरम्यान दोन ते तीन दिवसांपासून तरुणीचे वडिल गुप्तधनाबाबत फोनवर काही लोकांसोबत चर्चा करत होते. घरात चिडचिड करून तरुणीसह बहिणीला मारहाण करत होते. २४ एप्रिल रोजी रात्री कामाच्या कारणावरून तरुणीच्या वडिलांनी दोन्ही बहिणींना माराहण केली. २५ एप्रिल रोजी सकाळपासून तरुणीचे वडिल गुप्तधनाबाबत फोनवर बोलत होते. रात्री ९ वाजताचे सुमारास घरी गावातील विजय बावणे (४१), शेतात काम करणारा रमेश गुडेकार (५०) व बाहेरगावातील चार पुरुष व दोन महिला आल्या. सर्वजण मागच्या खोलीत गेले. त्यावेळी आई, लहान बहिण बाजूच्या खोलीत थांबून होते. वडिलांनी दरवाजा लावायला सांगितला व तू आता बाहेर यायचे नाही, तुझे येथे काम पडणार आहे, असे म्हटले. त्यानंतर चर्चा सुरू असताना त्यातील एकाने गुप्तधनासाठी एका व्यक्तीचा नरबळी आवश्यक आहे, असे म्हटले. वडिलांनी मोठ्या मुलीचा बळी देण्यास तयार आहे, असे म्हटले. वारंवार वाल्मिक बाबा अशा नावाने मांत्रिकाला हाका मारत होते. त्यांच्या बोलण्यातून ते सर्वजन राळेगाव येथून आल्याचे तरुणीच्या लक्षात आले. वडिलांनी बहिण, आई व तरुणीच्या हातात एक-एक लिंबू दिला व परत त्या खोलीत गेले. हा संपूर्ण प्रकार तरुणी लपून बघत होती. त्यावेळी वडिलांनी गणपतीसमोर दुर्वा ठेवल्या व दुधाचा नैवद्य दाखविला. त्या दोन महिलांच्या हाताने जागेची पूजा करण्यात आली. वडिलांनी जबरदस्तीने त्या खोलीत नेले व तेथे सर्वांनी तरुणीची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार टाकला. त्याचवेळी पोलीस आले व त्यांनी सर्व प्रकार थांबवून तरुणीचा जीव वाचविला. पोलिसांनी चौकशी केली असता मांत्रिकाचे नाव व अन्य नावे समोर आली.
पोलिसांनी केला गुन्हा दाखल : याप्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी संबंधितां विरुद्ध गुन्हा दाखल केला. यावेळी खड्डा खोदण्याचे साहित्य कुदळ, फावडे, टिकास, टोपले, पूजेचे साहित्य, चाकू, सुरी आदी पोलिसांनी जप्त केले. पुढील तपास पोलीस करत आहे.
'त्या' मॅसेजने तरुणीचा जीव वाचला : दोन महिलांनी पूजा केल्यानंतर उर्वरित लोक एक मोठा खड्डा खोदू लागले. तेव्हा भीती वाटल्याने मोबाइलमध्ये लपून गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्ड्याचा फोटो तरुणीने काढला. तसेच यवतमाळ येथील मित्र सचिन मेश्राम याला फोटो पाठविला. बळी जाण्याची शक्यता आहे, मला वाचव असा मॅसेज केला. त्यानंतर मोबाइल चेक होईल, या भीतीने तरुणीने फोटो व मॅसेज डिलीट केला. तरुणाने स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर एलसीबी बाभूळगावात पोहोचली. स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठण्यात आले. त्यानंतर घटनेचा उलगडा होवून मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा - बीडमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार, चुलत पुतण्याचा आरोपींमध्ये समावेश