यवतमाळ - चार महिन्यापूर्वी घरातील कर्त्या पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंबाचा आधारच गेला. वृद्ध सासू-सासरे आणि पाच मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी विधवा महिलेवर आली. आभाळा एवढं दुःख गिळून पती चालवत असलेल्या रिक्षालाच तिने उदरनिर्वाहाचे साधन बनवले. नेर तालुक्यातील परजना या बंजारा बहुल 400 लोकसंख्या असलेल्या गावातील अरुणा अशोक जाधव असे या विधवा महिलेचे नाव आहे. ती रिक्षा चालवित आपल्या कुटुंबाचा गाडा यशस्वीरित्या हाकत आहे.
केवळ दोनशे रुपये रोज
अरुणा जाधव हीने आत्मनिर्भर बनवून रिक्षा चालवण्याचा काम सुरू केले आहे. आपल्या परजना या गावातून अडगाव, शिरजगाव, अजंती, नेर, कारंजा, ललाड अशा ठिकाणी ती रिक्षा चालवत प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी सोडून देते. तर मजूरांना शेतातून ने-आन करणे, शेतकऱ्यांचे खतं शेतात पोहोचविणे, दुकानदारांच्या भाजीपाला आणणे, असे कामे ती रिक्षाच्या माध्यमातून करत आहे. डिझेल खर्च वगळून दोनशे रुपये दिवसाला तिच्या पदरात पडतात.
मुलांच्या भवितव्यासाठी हाती घेतली रिक्षा
अरुणा हिला पाच मुले असून मोठी मुलगी अमृता आठवीत, अर्पिता पाचवीत, यश चौथीत, उत्कर्ष सहावी तर लहान आदर्श अंगणवाडीत जाते. आपल्या मुलांचे पुढे काय होणार, घरी शेती नाही. आजपर्यंत केवळ शेतात मोल मजुरीचे काम तिला येत होते. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तिला भेडसावत होता. काहीही करून मुलांना चागले शिक्षण द्यायचे. शिक्षक, पोलीस, अधिकारी बनवायचे तिचे स्वप्न आहे. आपल्यावर जी परिस्थिती आली ती मुलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी दुःख सारून तिने रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला.
शासनाकडून मदतीची अपेक्षा
कोरोनामुळे कुटुंबच उध्वस्त झाले. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आली. आटो चालवून घराचा उदरनिर्वाह करत आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत शासनाने द्यायला हवी. किमान मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी शासनाने मदत करायला हवी, एवढीच रास्त अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.
हेही वाचा - कोरोना चाचणी नसेल तर रेशनही नाही; पंढरपुर तालुक्यातील 21 गावांत प्रशासनाकडून कठोर उपाययोजना