मुंबई - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात काश्मिरी लोकांवर हल्ल्याचे सत्र सुरू आहे. यवतमाळमध्येही मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. त्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची आज हकालपट्टी करण्यात आली आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
एक शासकीय कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी यवतमाळच्या घटनेवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच, युवकाला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार ठाकरे यांनी ट्विट करून कारवाई केल्याचे जाहीर केले आहे. राग हा दहशदवादाविरोधात आहे. दहशदवादाची शिक्षा कोणत्याही भारतीयाला नको, असे ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण -
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर देशातील विविध भागांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आल्या आहे. असाच प्रकार यवतमाळमध्ये शिक्षण घेत असलेल्या ३ ते ४ काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला होता. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली होती. यवतमाळ आणि पुसद येथील कॉलेजमध्ये काश्मीर येथील जवळपास अनेक युवक शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या अनुषंगाने कुठलीही अनुचीत घटना घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडूनही प्रयत्न केले जात आहेत.