यवतमाळ : घरावरून गेलेली 33 केव्हीची वीज तार अचानक तुटली. त्यामुळे अनेक घरांतील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. ही घटना 27 मे रोजी यवतमाळ लगतच्या किन्ही येथे घडली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, वीज वितरणाच्या हलगर्जीपणामुळे वीज तार तुटल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
यवतमाळच्या किन्हीत दुर्घटना घटनाक्रम असा आहे : यवतमाळलगतच्या किन्ही येथे वीज तार तुटून पडल्याने एकच खळबळ उडाली. सकाळच्या वेळी घरी कुणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, लोकांचे आर्थिक नुकसान झाले. कवडू राठोड, गोविंद राठोड आणि बाळू तुरी यांच्या घरावरून विद्युतवाहिनी गेली आहे. ही तार तुटून पडू शकते, अशी माहिती वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या पूर्वीच देण्यात आली होती. परंतु, कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. वीज तार तुटून पडताच जमिनीला छिद्र पडले. मोठ्याने आवाज आल्याने नागरिकांनी घरातून बाहेर येऊन बघितले असता, घडलेला प्रकार समोर आला. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणाबद्दल नागरिकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. वीज वितरण कंपनी व यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
हेही वाचा : शेतातील मोटरपंप चालू करताना विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू