वाशिम - घर शाळेत आणि शाळा घरात शिरली पाहिजे. आई-वडिलांनी शिक्षक आणि शिक्षकांनी आई-वडील बनले पाहिजे, हा विनोबांचा शिक्षणविषयक विचार. शिक्षण अर्थपूर्ण व आनंददायी बनण्यासाठी हा विचार खूपच उपयुक्त ठरू शकतो. तो प्रत्यक्षात आणलाय वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी. अजिनाथ मोरे आपल्या कर्तव्यासोबतच परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम ही करत आहेत, ते दररोज परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पोलीस ठाण्यात शाळा भरवतात हे विशेष. याबद्दल जाणून घेऊया ईटीव्ही भारतच्या या खास रिपोर्टमध्ये...
ठाण्यातच विद्यार्थ्यांना धडे द्यायचे ठरविले -
मोरे हे पोलीस विभागात यायच्या आधी 2010 ते 2011 मध्ये शिक्षक म्हणून शाळेवर कार्यरत होते. त्यांनी त्यावेळेस सुद्धा विविध दिग्गज नेतृत्व, उत्तम विद्यार्थी घडवले. पण त्यांची इच्छा व जिद्द ही पोलीस आधिकारी होण्याची होती. ते पोलीस अधिकारी बनलेही, मग शिक्षकाची नोकरी सोडली व ते पोलीस खात्यात रुजू झाले. पण आजही त्यांना शिक्षणापासून कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये असे वाटते. त्यासाठी त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या मदतीने ठाण्यातच शाळा उघडायची ठरवली होती. आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यायचे होते.
ठाण्यात 25 मुले येतात धडे गिरवायला -
लॉकडाऊनमध्ये बंद असणाऱ्या शाळा आणि त्यामुळे होणारे नुकसान हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यातच जिथे नेटवर्क आहे तिथे किमान ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. पण ग्रामीण भागात जिथे नेटवर्क नाही आणि शाळाही बंद तिथे नेमकं काय करायचं हा प्रश्न सर्वासमोर आहे. याच प्रश्नावर वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथील ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी एक भन्नाट कल्पना शोधली. त्यांनी पोलीस स्टेशनला शाळा बनवत रोज विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे धडे देण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी ब्लॅक बोर्डवर विद्यार्थ्यांना सक्सेस या विषयावर शिक्षण देणे सुरू केले. आज त्यांच्या शाळेत एक नाही दोन नाही तब्बल 20 ते 25 मुले-मुली आहेत. जे दररोज शिक्षणासाठी पोलीस ठाण्यात येतात.
शाळेसारखेच पोलीस स्टेशन वाटते -
दोन वर्ष झाले कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यात शाळा बंद आहेत. त्यामुळे आम्हाला शाळेत जाणे शक्य नव्हते व नेटवर्कमुळे ऑनलाइन क्लास होत नव्हते. मात्र आमच्या गावातील पोलीस स्टेशनचे ठाणेदार मोरे हे आम्हाला रोज पोलीस स्टेशनमध्ये शिकवतात. पोलीस स्टेशन हे कसे असत याविषयी सुद्धा मार्गदर्शन करतात. त्यामुळे पोलिसांपासून जी भिती आम्हाला वाटायची ती आता वाटत नाही, आम्हाला त्यांचा आदर वाटतो. आमच्या शाळेसारखे पोलीस स्टेशन वाटत असून आम्ही रोज शिक्षण घेण्यासाठी तेथे जातो, असे एका विद्यार्थ्याने सांगितले आहे.
आम्ही रोज तासिकेला हजर होते -
मोरे सर हे आम्हाला रोज शिकवत आहेत, विशेष म्हणजे यात ग्रॅमर, इंग्रजी इतर विषयासह पोलीस स्टेशनच्या कामकाजाबद्दल माहिती देतात. त्यामुळे आम्हाला याचा खूप फायदा होत असून पोलीस स्टेशनमध्ये शाळेसारखी बैठक केली आहे. त्यामुळे आम्ही रोज शाळेसारखे मोरे सराच्या तासिकेला हजर होतो असे विद्यार्थ्यांनी बोलतांना सांगितले.
ठाणेदार मोरेंचे सर्वत्र कौतुक -
मोरे हे विद्यार्थ्यांची इंग्रजीची वर्ग तासिका घेतात व विद्यार्थीही मन लावून शिकतात ते विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये बोलतात आणि विद्यार्थीही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देतात. पोलीस ठाण्यात सुरू असणाऱ्या या शाळेचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हेही वाचा - सागरी जिवांची, साहसी खेळांची आवड आहे? सेशेल्समधील 'ही' ठिकाणे तुम्हाला भुरळ घालतील