वाशिम - मालेगाव पोलिसांनी पुढाकार घेत दिल्ली हैदराबाद महामार्गावर वाशिम ते मालेगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये ठाणेदार आधारसिंग सोनुने यांच्या १५ पोलिसांनी सहभाग घेतला. त्यामुळे आता वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने मलेगाव वाशिम रस्त्याच्या मधोमध तयार झालेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, मालेगाव पोलिसांनी स्वतः खड्डे बुजवणे सुरू केले आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या खड्ड्यांमुळे एका अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांची समस्या व संभाव्य धोका लक्षात घेता मालेगाव पोलिसांनी पुढाकार घेत सदर खड्डे बुजवणे सुरू केले आहे.
मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राबविलेला उपक्रम अतिशय उत्तम आहे. जीवघेणे खड्डे बुजवण्यात येत असल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.