वाशिम - जिल्ह्यात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेकडो हेक्टरवरील संत्री फळबागांचे नुकसान झाले. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. वादळी वारा व अवकाळी पावसामुळे संत्र्याचा बहर मोठ्या प्रमाणात नष्ट झाला. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
रब्बी पिकांमध्ये कांदा, ज्वारी, मका, गहू, हरभरा, आंबा पिकाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वादळी वार्यासह पडलेल्या पावसामुळे या पिकांचे जवळपास २० टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरात अवकाळी पावसामुळे विनोद राऊत या शेतकऱ्याचे 18 एकरातील तोडणीला आलेल्या संत्री फळफळबागेचे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. या अगोदरही परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाने नुकसानीचे पंचनामा न केल्याने शासकीय मदत मिळाली नव्हती. त्यामुळे किमान रविवारी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तरी सरकारने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा... कौतुकास्पद : 'या' विद्यालयाने विद्यार्थ्यांना दिलेली 'शपथ' पाहून तुम्हालाही होईल आनंद !
वाशिम जिल्ह्यातील वनोजा परिसरात संत्र्याच्या फळबागा मोठ्याप्रमाणात आहेत. सचिन राऊत यांची 18 एकर परिसरात संत्र्याची बाग असून कमी पावसामुळे व प्रतिकूल वातावरणामुळे मृगाचा बहर फारसा आला नाही. त्यातच परतीच्या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने लहान लहान संत्री पिकाची प्रचंड गळती झाली होती. त्यातून शेतकऱ्यांनी फळबागा जपल्या मात्र रविवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने संत्रा बागेचे मोठे नुकसान झाले. यात राऊत यांच्या बागेचे लाखोंचे नुकसान झाले.
ज्या शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेवून हे पीक घेतले. ते या अवकाळी पावसामुळे पूर्णपणे नष्ट झाले. तेव्हा संत्री पिकांच्या नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करण्यात येऊन अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.