वाशिम - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शासनाने ग्रामपंचायतीला दिलेल्या नियमानुसार घोटा ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्यासाठी आजपर्यंत दीड लाखांचा खर्च केला आहे. मंगरुळपीर तालुक्यातील या ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून हा खर्च केला.
यामध्ये गावात जंतुनाशक फवारणी, सॅनिटायझर वाटप, अपंगांना मोफत धान्य तसेच, गावात औषधांचा साठा, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना प्रोत्साहनपर मानधन देणे या सर्व उपाययोजना केल्या आहेत. गावातील नागरिक विनाकारण फिरत असल्याचे किंवा विनामास्क आढळून आल्यास दोनशे रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये रोजगार हमीची काम करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे गावातील मजुरांना जलसंधारणासारखे काम सुरू करून गावातच रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सरपंचांनी सांगितलेय.
मंगरुळपीर तालुक्यातील पोटी उपआरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या दहा गावांपैकी घोटा ग्रामपंचायतीने शहरांतून गावात आलेल्या सर्व नागरिकांच्या नोंदी करून त्यांच्या आरोग्याची तपासणी केली आहे. ही आरोग्य विभागाला सहकार्य करणारी पहिलीच ग्रामपंचायत असल्याची माहिती डॉ. पूनम वानखेडे यांनी दिलीय.