वर्धा- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. यामुळे त्या परिसरात मेळाव्याच्या काळात उपस्थित असणाऱ्यांचे मोबाईल ट्रेस करण्यात आले आहेत. त्यानुसार त्या नावांची यादी संबंधित जिल्ह्याला पाठवण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातही बुधवारी सकाळी 8 आणि रात्री 14 अशी एकूण 22 व्यक्तींची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. मात्र, यातील एकही व्यक्ती मरकझ मेळाव्यात सहभागी झाली नसल्याचे गुरुवारी जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- COVID 19 : एमी पुरस्कार विजेत्या गायकाचं कोरोनामुळे निधन
प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील 22 व्यक्तींच्या मोबाईल नंबरवर तसेच दिलेल्या पत्त्यावर संपर्क करण्यात आला आहे. यातील 15 व्यक्ती बाहेरच्या जिल्ह्यातील, राज्यातील आहेत. यामध्ये दिल्ली, बिहार, नागपूर, भंडारा, अकोला आणि पुण्याचा समावेश आहे. त्या-त्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून त्यांना याबाबत अवगत करण्यात आले आहे.
22 पैकी 7 व्यक्ती वर्धा जिल्ह्यात 16 ते 19 मार्चच्या दरम्यान परत आल्या आहेत. या व्यक्ती आर्वी 1, हिंगणघाट 2, देवळी 1, कारंजा 1, आणि वर्धा 2 तालुक्यातील आहेत. खबरदारी म्हणून आर्वी मधील एका व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील 4 व्यक्तींना काल सामान्य रुग्णालयातील अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अद्याप कोणतीही लक्षणे नाहीत. त्या सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी नागपुरला पाठविण्यात आले आहेत. चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तसेच हिंगणघाटमधील एका व्यक्तीला खबरदारी म्हणून गुरुवारी तेथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या व्यक्तीतही कोणतीही लक्षणे नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.
उर्वरित 5 व्यक्ती होम-क्वारंटाईन आहेत. त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी एक ते दोन दिवसात संपेल, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात परतलेल्या सात व्यक्तींपैकी कुणीही निजामुद्दीनच्या तबलिगी-ए-जमातीच्या मेळाव्यात सहभागी झाले नसल्याचेही आरोग्य विभागाने कळविले आहे. तथापि खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत.
मोबाईल नसणारे व्यक्ती किती?
दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ येथील धार्मिक कार्यक्रमाच्या परिसरात उपस्थित असणाऱ्यांचे मोबाईल ट्रेस करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी एकाच कुटुंबाबतील अनेक जण होते. काहींकडे मोबाईल नव्हते. या बाबत अद्याप कुठलाही खुलासा झाला नाही. यामुळे पुढील काळात आणखी काही जणांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.