वर्धा - गृह विलगीकरणात असणारे कुटुंबातील व्यक्ती बाहेर फिरत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. अशा नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने एक नवीन आदेश काढला आहे. गृह विलगीकरणाचा नियम मोडल्यास दंड आणि गुन्हा दाखल करण्यात येईल. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीचा 28 दिवस इन्स्टिट्यूटशनल क्वॉरंटाईन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली.
जिल्ह्यात 36 हजार पेक्षा जास्त नागरिक आले आहेत. कोरोना रूग्ण सापडलेल्या कुटुंबातील लोक क्वॉरंटाईन न राहता बाहेर फिरत असल्याचे उघडकीस आले. यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तो टाळण्यासाठी हे नवीन आदेश काढण्यात आले आहेत.
जिल्हा कोरोनामुक्त रहावा यासाठी प्रशासनाने अनेक प्रयत्न केले. मात्र, नागरिकांना जिल्ह्यात येण्याची मुभा मिळाली आणि कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे क्वारंटाईचे नियम मोडणाऱयांवर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. या प्रकरणी 13 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर 58 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
10 हजाराचा दंड, 28 दिवस इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन,
गृह विलगीकरणाचे नियम मोडणे आता चांगलेच महागात पडणार आहे. कारण नियम मोडल्यास चौदा दिवसांऐवजी 28 दिवस बाहेर आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. यासह 10 हजाराचा दंड आणि कलम 188 अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात येईल. यामध्ये 2 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद सुद्धा आहे. यामुळे घरात रहा सुरक्षित रहा, घरात रहा कोरोना योद्धा व्हा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.
विषाणूचा संसर्ग पसरवण्यासाठी कारणीभूत ठरल्याच्या पार्श्वभूमीवर एका कुटुंबातील 4 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबातील चारही व्यक्तींवर प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे. त्याचबरोबर सावंगी मेघे येथील एका दाम्पत्यावर दंड आकारत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा तालुक्यात गृह विलगीकरणात असलेल्या 14 नागरिकांवर घराबाहेर फिरताना आढळून आल्यामुळे कारवाई करण्यात आली. यात 9 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नोडल अधिकारऱ्यावर सुद्धा होणार कारवाई -
गृह विलगीकरणात असलेल्या कुटुंबांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावंगी मेघे येथील कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती घराबाहेर पडून कोरोना संक्रमण वाढवत होती. या प्रकरणात या भागातील नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.