वर्धा - 'ईव्हीएम हटाव देश बचाव घोषणा देत' ईव्हीएम विरोधात आज सर्व राज्यभरात भारीप बहुजन महासंघाकडून घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत आज वर्ध्यातही वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी 'ईव्हीएम हटाव, देश बचाव'ची मागणी करण्यात आली.
हे घंटानाद आंदोलन वंचित आघाडीचे लोकसभेचे उमेदवार धनराज वंजारी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व 48 मतदार संघांमध्ये अनेक ठिकाणी मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी झालेले मतदान यांमध्ये तफावत असल्याचे समोर आहे. हा वाद समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने यावर समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने 'ईव्हीएम' विरोधात भारीप बहुजन महासंघाकडून राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे (बॅलेट पेपर) मतदान व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
ईव्हीएममधील मतांची चोरी - वंजारी
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 48 जागेपैकी 22 जागेवरील झालेल्या मतदानापेक्षा मोजलेले मतदान जास्त असल्याचे दिसून आले आहे. याचे उत्तर जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. यानंतर न्यायालयात धाव घ्यावी लागेल. निवडणूक आयोग यावर उत्तर देत नसेल, तर ही लोकांची फसवणूक असल्याचे वर्धा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ईव्हीएम हटविण्याची मागणी केली.