नागपूर - संघाची भूमी असल्याने भाजपला नागपूर लोकसभेची जागा गमावणे परवडण्यासारखे नाही. कारण येथे पराभूत होणे म्हणजे त्यांचे नाकच काय पूर्ण शिर कापल्यासारखेच होईल. त्यामुळेच नितीन गडकरी हे पराभूत होण्याच्या भितीने मी पाच लाख मतांनी विजयी होईल, अशाप्रकारची वक्तव्य करत असल्याचे विदर्भ निर्माण महामंचाचे श्रीहरी अणे यांनी नागपूर येथे सांगितले.
श्रीहरी अणे विदर्भ निर्माण महामंच समर्थीत लोकजागर पार्टीचे लोकसभेचे उमेदवार ज्ञानेश वाकुडकर यांच्या प्रचार्थ आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मंचावर वाकोडकर अशा अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीहरी अणे म्हणाले की, नितीन गडकरी हे जरी यशस्वी नेते असले तरी ते देव नाहीत. त्यामुळे शेवटच्या मताची मोजणी होईपर्यंत मला इतके मत मिळतील हे सांगणे योग्य नाही. उद्या जर भाजपला युतीत सत्ता स्थापन करावी लागली तर मोदींचा नंबर लागणे शक्य नाही. तेथे गडकरींचा नंबर लागतो. त्यामुळे नागपूरची जागा गमावणे भाजपला परवडत नाही, असे श्रीहरी अणे यांनी सांगितले.
यावेळी श्रीहरी अणे म्हणाले की राज ठाकरे यांच्या बोलण्याचे मला नेहमीच कुतूहल असते. ते अगदी सहजपणे सत्य सांगून जातात. ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोदींनी देश खड्ड्यात टाकला याला दुजोरा मिळाला आहे. यावेळी अणे यांनी पंतप्रधान मोदींच्या कामावर खेद व्यक्त करत मोदींनी राष्ट्रीय संस्था बरखास्त केल्याचा आरोप केला. तसेच येत्या काळात विदर्भ निर्माण मंच मोठ्या ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उमेदवार वाकुडकर यांनी काँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस आणि भाजपचे रामदास तडस यांच्यावर टीका केली.