वर्धा : वर्ध्याच्या पुलगाव येथे सात वर्षीय चिमुकलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच, रामनगर पोलिसात आणखी एक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. यात 7 आणि 9 वर्षीय चिमुकलीवर 20 वर्षीय छोट्या नामक तरुणाने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले आहे. ही घटना गुरुवारची असून पीडितेच्या लहान भावाने हे कृत्य आईला सांगितल्याने रविवारी हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्ध्यातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दोन लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी दुपारी कुटुंबीय नसल्याने दोन्ही लहान मुली आणि त्यांचा भाऊ असे तिघेजण खेळत होते. यावेळी, आरोपी त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. दरम्यान घरात कोणी नसल्याचे लक्षात येताच त्याने संधी साधली. एक-एक करत त्याने दोन्ही लहान मुलींना घेऊन घरात नेऊन कृत्य केले. हा सगळा प्रकार लहान भावाने पाहिला. यानंतर, आरोपीने कुठे वाच्यता केल्यास तिघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनेनंतर तिघेही भीतीच्या वातावरणात असल्याने त्यांनी सुरुवातीला काहीच बोलून दाखवले नाही. मात्र, शनिवारी लहान भावाने भीत भीत सगळा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर दोन्ही मुलींनी घडलेली हकीकत बोलून दाखवली.
हा प्रकार एकूण दोन्ही कुटुंबियांना जबर धक्का बसला. या प्रकरणी मुलींच्या आईने रामनगर पोलिसात जाऊन तक्रार केली. तक्रार मिळताच पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल केला. लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराची दोन दिवसातील ही दुसरी घटना असल्याने, घटनेची गंभीरता पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, रामनगर पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी घटनास्थळी भेट दिली. घडलेला प्रकार जाणून घेता आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.