वर्धा - राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या देशामध्ये अहिंसा आणि हिंसा यातील फरक अजूनही काही लोकांना कळलेला नाही. अत्यंत निंदनीय हा विषय आहे. अहिंसेच्या ताकदीचा विसर पडला असेल तर, येणार्या काळात लोकशाहीच्या माध्यमातून चोख उत्तर दिले जाईल. आम्ही काँग्रेसचे लोक आहोत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारधारेवर स्वतः समाजकारण आणि राजकारण करतो आहोत. अहिंसेच्या माध्यमातून चोख उत्तर देऊ, असे मत पशुसंवर्धनमंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.
ते वर्ध्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सेवाग्राम येथे आले होते. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत हाथरस येथे झालेल्या घटनेवर ते बोलत होते. महिलांवर अत्याचार होत असतानाही सत्तेच्या मस्तीमध्ये वागत असाल तर, कुठल्या क्षणी धराशाही व्हाल, हे कळणार देखील नाही. अशा शब्दांत सुनील केदार यांनी सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री तथा आमदार रंजित कांबळे, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू तिमांडे उपास्थित होते.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काल (गुरुवारी) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देशात काँग्रेसचे नेते संतप्त झाले असून घडलेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त करत आहेत.