वर्धा - आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तिने ट्विट करत संपूर्ण जगाला प्रश्न विचारला, आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत का बोलत नाही. या ट्विटनंतर भाजपाच्या काही चमच्यांच्या पोटात दुखते आहे, असे म्हणत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी कंगना राणौतवर टीका केली. त्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान वर्ध्यात बोलत होत्या.
खाल्लेल्या अन्नाची तरी लाज बाळगावी -
अनेक जण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मात्र, अभिनेत्री कंगनाने याबाबत ट्विट करत हे शेतकरी दहशतवादी असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवणारे तुम्ही कोण? तुमच्याकडे याचे पुरावे आहेत का? पुरावे असतील तर ते सादर करावे. आपण ज्या देशात राहतो, ज्या देशाचे अन्न आपण खातो ते अन्न अन्नदात्या शेतकऱ्याने पिकवलेले आहे, याचे भानही ठेवले तर स्वतःलाच लाज वाटेल, अशी सणसणीत टीका चाकणकर यांनी केली आहे.
खरा दहशतवादी कोण याचा अभ्यास करावा -
परदेशी गायिका रिहाना यांना या देशाच्या शेतकऱ्यांची काळजी वाटते. त्यावेळेस भारतीय असलेली कंगना अशा पद्धतीने ट्विट करत शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवते. तिची ही संकुचित वृत्ती अत्यंत किळसवाणी असल्याची टीका रुपाली चाकणकर यांनी केली. भाजपा विरोधी बोललेले प्रत्येक वाक्य यांना दहशतवादी का वाटते हे समजण्या पलीकडचे आहे. अशा पद्धतीची वक्तव्ये करत असताना खरा दहशतवादी कोण आहे? याचा अभ्यास कंगनाने करावा, असाही सल्लाही प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांनी दिला.