वर्धा - वीज दरवाढी आणि भरमसाठ बिलामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या विरोधात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे वाढलेली दरवाढ चुकीची असल्याचे म्हणाले होते. त्यांनी अनेक ठिकाणी भीक मांगो आंदोलन केले. पण वीज दरवाढीला माजी ऊर्जामंत्री जबाबदार आहेत. त्यांनी योग्य काम केले असते तर भीक मांगो आंदोलन करण्याची वेळ आली नसती. वीज दरवाढ झाल्याने ते भीक मागत आहे, मग आम्ही काय पेट्रोल, डिझेलची दरवाढ झाल्याने भीक मागायची काय, असा सवाल ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. आम्हाला राजकारण करायचे नाही, त्यांनीही राजकीय स्टंटबाजी करू नये असेही ते म्हणाले.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आज वर्ध्यात आले होते. स्थानिक शिव वैभव मंगल कार्यालयात त्यांनी वीज समस्या आणि बिलाची दरवाढ संबंधी प्रश्न ऐकूण घेतले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी बिलातील दरवाढ ही काही दोन तीन महिन्याच्या अहवालात करून ठरली नाही. त्याला अनेक महिन्याचे अवलोकन असते. यात माजी ऊर्जामंत्री यांनी योग्य काम केले असते, तर ही वेळ आली नसती असाही टोला लगावला.
यावेळी बोलताना त्यांनी युजीसीपरीक्षेच्या गाईड लाईन बाबतही भाष्य केले. महाराष्ट्रात परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नाही. जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन होते. सध्या महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे, ती पाहता परीक्षा किती पुढे ढकलायच्या याचाही विचार केला पाहिजे. मुलांना आणखी किती काळ मानसिक तणावात ठेवायचे तेही बघितले पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांचे जॉब आहे, डिग्री हातात येण्यापूर्वी त्यांना मिळालेले जॉबदेखील धोक्यात आले होते. सर्व गोष्टी विचारात घेऊन परीक्षा रद्द करण्याचे राज्य शासनाचे धोरण होते. युजीसीच्या गाईडलाईन ग्राउंड पातळीला धरून नाहीत. युजीसीच्या गाईडलाईन पाळाव्याच असेही नाही. त्यामुळे याचा अभ्यास करून पुढील निर्णय काय घ्यायचा ते ठरवू, असेदेखील तनपुरे यावेळी म्हणाले.
त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाईट बंद करण्याचे आवाहन केले. मात्र त्यावेळी योग्य निर्णय घेऊन परिस्थिती सांभाळावी लागली. पण शेवटी देशाचे पंतप्रधान असल्याने आवाहन पाळायला हवे असेही ते म्हणाले.
नागरिकांना दिलेले बिल हे मीटर रिडींगच्या आधारे आहे. अवास्तव बिल दिले असल्यास बिल पाहणी करून ते दुरुस्त करुन देऊ असेही ते म्हणाले. यावेळी एमआयडीसी अंतर्गत उद्योगांना होणाऱ्या अडचणी, वीज देयक हे सुद्धा त्यांनी जाणून घेतले.
यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख, राष्ट्रवादीचे किशोर मानकर, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश वानखडे आदींसह अनेक पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.