वर्धा - सेवाग्राम एमआयडीसीत सरकी ठेवलेल्या गोदामाला अचानक आग लागली. ही घटना सोमवारी दुपारी साडेपाच वाजता घडली. गोदाममध्ये कोणतेही काम चालू नसताना अचानक लागलेल्या आगीमुळे गोंधळ उडाला. सरकीने लवकरच भेट घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात चांगलीच कसरत करावी लागली. अग्निशामक बंबाच्या साहाय्याने आग विझवण्यात आली. या गोदामात सात हजार क्विंटल सरकीची पोती असल्यास माहिती पुढे येत आहे.
संस्कार ऍग्रो प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक पवन सिंघानिया यांच्या मालकीची ही सरकी असल्याचे सांगितले जात आहे. सेवाग्रामच्या एमआयडीसीमधील श्रमिक दाल मिल इंडस्ट्री आहे. याच परिसरालगतच्या गोडाउनमध्ये सरकी ठेवण्यात आली होती. सरकीत तेलाचे प्रमाण असल्याने आग लागताच प्रचंड भडका उडाला. घटनेची माहिती मिळतात पाण्याचा मारा करण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच नगर परिषद वर्ध्याचे तीन बंब पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोहोचून पाण्याचा मारा केला असता जवळपास दोन ते अडीच तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतरही उशिरापर्यंत पाण्याचा मारा करत कुलिंगचे काम सुरूच राहिले. सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय बोठे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. पुढील चौकशी सुरू आहे.