वर्धा - बस स्थानकाला लागून असलेली महात्मा गांधी जिल्हा परिषद तथा कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारातील एक इमारत जळून खाक झाली. दुपारी 2 वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे फिजिक्स लॅब असलेली इमारत जळून नष्ट झाली. तब्बल अर्धा तासानंतर आलेल्या अग्निशामकच्या मदतीने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यात साधारण 15 ते 20 लाखाच्या घरात नुकसान झाल्याचे बोलाले जात आहे.
हे ठिकाण बसस्थानकाला लागून असल्याने रस्त्यावरून जाताना आगीचे लोळ उठताना दिसले. यामुळे परिसरात लोकांनी गर्दी केली. काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. यात शाळेच्या तीन खोल्या जळून खाक झाल्या. हळूहळू ही आग इतर खोल्यांकडे पसरत होती. फिजिक्स लॅबपासून आग पसरलेल्या एका खोलीत रासायनिक शास्त्राची लॅब होती. सुदैवाने अर्धा तास उशिरा पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांमुळे ती खोली थोडक्यात वाचली. अग्निशामक बंबच्या साह्याने ही आग विझवायला सुरुवात करण्यात आली. मात्र, अग्निशामक बंब येईपर्यंत भौतिकशास्त्र विभागाची प्रयोगशाळा यात जळून खाक झाली. विशेष म्हणजे लाकडी आणि कवलारू छत असल्याने इमारत पूर्णतः कोसळली.
आगीचे कारण? झालेले नुकसान -ही आग दुपारी लागली आहे. त्यामुळे कशाने लागली हे स्पष्ट समजू शकले नाही. मात्र, याच लॅबच्या बाहेर पोषण आहार शिजवण्याचे किचन शेड आहे. येथून किंवा परिसरात कचऱ्याचे ढिगारे जळताना दिसत होते. त्यामुळे यातील एखादी ठिणगीतून आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात फिजिक्स लॅबचे साहित्य तसेच काही दिव्यांग बांधवांच्या व्हील चेअर सुद्धा ठेवण्यात आल्या होत्या असे सांगण्यात येत आहे. इमारत साहित्य फर्निचर बघता 15 ते 20 लाखाच्या घरात नुकसान झाल्याचे उपमुख्यकार्यकरी अधिकारी विवेक इलमे यांनी शक्यता वर्तविली आहे.
शाळेचा जुना इतिहास....
ही शाळा 1835 मध्ये इंग्रजांच्या काळात बांधण्यात आली आहे. या शाळेतून वर्ध्याचे पहिले आमदार सत्यनारायण बजाज, समाजसेवक डॉ. अभय बंग, वर्धा महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद बाबू शिंदे. माजी आमदार सुरेश देशमुख आदी मान्यवर व्यक्तींनी शिक्षण घेतले आहे. कदाचित याच भौतिक शास्त्राच्या लॅबमध्ये त्यांनी शिक्षण घेतले, असा बराच मोठा इतिहास शाळेला लाभला आहे. तसेच महात्मा गांधीच्या नावाने असणारी एकमेव जिल्हा परिषद शाळा आहे.
घटनेची माहिती स्थानिकांनी पालिकेच्या अग्निशामक विभागाला दिली. मात्र, घटनेच्या तीस मिनिटांनी अग्निशामक दल दाखल झाले. शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला असून शाळेत महिला शिपाई आणि शिक्षक हजर होते. घटनास्थळी जिल्हापरिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी विवेक इलमे, नप मुख्याधिकारी अश्विनी वाघामोळे, नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी भेट दिलीय. तसेच वर्धा शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी हे सुद्धा पोहचले होते.