वर्धा - नगरपरिषद उपाध्यक्षांनी पायातील बूट फेकून मारल्याचा आरोप, नगर रचना सहायकाने केला आहे. त्याने याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी उपाध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.
उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर यांनी सहायक नगर रचनाकार शंतनू देवईकर याला १६ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दालनात बोलावले. ठाकूर यांनी सुदामपुरी येथील अवैध असलेल्या कृपलानी याचे बांधकाम का पाडले नाही तसेच त्याच्यावर काय कारवाई केली याची माहिती विचारली. त्यांना योग्य उत्तर न दिल्याने उपाध्यक्षांनी अश्लील शिवीगाळ करुन मला डायरी आणि जोडा फेकून मारला, अशी माहिती देवईकरांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना दिली. मात्र, या घटनेबाबत उपाध्यक्षांनी सगळे आरोप फेटाळले आहेत.
कृपलानीच्या अवैध बांधकामवरुन झाला वाद
केसरीमल कन्याशाळेसमोर कृपलानी यांनी नगरपरिषदेची परवानगी न घेता वरच्या मजल्यावर बांधकाम केले. त्यामुळे नगरपरिषदेने त्यांच्याकडून दंड वसूल करुन एका लाखाच्या घरात डबल टॅक्स घेतला. यावेळी त्यांना योग्य कागदपत्रे सादर न केल्यास इमारत पाडण्यात येईल, असेही सांगण्यात आले, अशी माहिती मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी दिली.
हा प्रकार अशोभनीय
प्रशासकीय कामकाजात एक पद्धत असते. त्यामुळे आज झालेला प्रकार अशोभनीय आहे. मारहाण करणे हा प्रकार चुकीचा आहे. तसेच बांधकामाबाबत १२९ प्रकरणाची यादी तयार आहे. नियमानुसार दुप्पट दंड आकारणी करण्याचे काम सुरू आहे. यात काही लोकांकडून ४ लाखाच्या आसपास दंड वसूल करण्यात आला. लवकरच शासकीय नियमानुसार बांधकाम पाडण्याची सुद्धा कारवाई केली जाईल. मग कोणीही असले तरी सुटणार नाही. मात्र केवळ एकावर कारवाई करणे योग्य नाही, अशीही माहिती मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यानी ईटीव्हीला बोलताना दिली.
घटनेनंतर कर्मचाऱ्याने पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या कलमातर्गंत गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. तसेच नगरसेवक यांनी सुद्धा निवेदन दिले यावर सुद्धा चौकशी केली जाईल, अशी माहिती ठाणेदार योगेश पारधी यानी दिली.