वर्धा - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाने नवीन कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये 'सखी मतदान केंद्र' अशी संकल्पना राबवण्यात आली. यामध्ये मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी ही महिला अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. वर्ध्यातील पंचायत समिती कार्यालयात दोन मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, मतदान केंद्राच्या संरक्षणाची जबाबदारीही महिला पोलीस कर्मचाऱयांना देण्यात आली आहे.
वर्ध्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदार संघांमध्ये दोन सखी मतदान केंद्र अशा पद्धतीने सहा विधानसभा मतदारसंघात १२ केंद्र तयार करण्यात आले होते. महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. मतदानाच्या या उत्सवात दिलेली जबाबदारीही महिलांनी योग्यरित्या पार पाडली आहे. अशी माहिती नोडल अधिकारी मनीषा सावळे यांनी दिली.
महिलांना निवडणुकीत संपूर्ण मतदान केंद्राची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. संपूर्ण मतदार केंद्राचा अधिकार महिलांना देण्यात आला होता. यामध्ये एक प्रिसायडिंग अधिकारी, ३ मतदान अधिकारी, २ पोलीस महिला अधिकारी, अशा पध्दतीची सखी मतदान केंद्राची आखणी केलेली पाहायला मिळाली.