वर्धा - सेवाग्राम रुग्णालयात सर्वात पहिल्या कोरोना केअर युनिटसाठी मान्यता मिळाली. मात्र, रुग्णालयात मागील काही काळात घडलेल्या प्रकारामुळे प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपास्थित होत आहे. दोन रूग्ण बेड न मिळाल्याने खालीच झोपले असल्याचे फोटो आता व्हायरल होत आहेत. यामुळे रुग्णालय प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
वर्धा महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेअंतर्गत कस्तुरबा रुग्णालयात वर्ध्यासह लगतच्या राज्यातीलही काही रूग्ण येऊन उपचार घेतात. गेल्या काही दिवसांपासून मात्र, विविध घटनांमधून रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 28 ऑगस्टला रात्री 12 वाजता एका राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णलयात हलवण्यात आले. यावेळी त्यांना बेड उपलब्ध होण्यास तीन वाजेपर्यंत वाट पहावी लागली. यादरम्यान, त्यांना चादर टाकून जमिनीवरच झोपवण्यात आले. याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावर सामान्य नागरिकांसह विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काही लक्षणे नसलेल्या मात्र, पॉझिटिव्ह आढळत असलेल्या नागरिकांना रुग्णालयात भरती केले जात आहे. यामुळेही नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. यावर महात्मा गांधी आयुर्विज्ञानसंस्थेचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे यांच्याशी संपर्क साधला असता, नेमके त्या दिवशी काय घडले याची चौकशी करून माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.