वर्धा - उत्तरप्रदेश पोलिसांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना हाथरस येथे जात असताना वाटेतच अटक केली. एवढेच नव्हे तर पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवर्तणूक करत धक्काबुक्की केली. या घटनेचा निषेध करत जिल्हा काँग्रेस कमिटीने वर्धेच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर काळ्या फिती लावत निदर्शने केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली.
पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटीला जाताना राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहे. तर सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. धक्काबुक्की करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.