वर्धा : अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतलेल्या निर्णयानुसार वर्धा जिल्ह्यात संपूर्ण अंगणवाडी कर्मचारी संपात सहभागी होत आहेत. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी भव्य मोर्चा काढून आपला रोष कर्मचारी प्रकट करणार आहेत. असे जिल्हा अध्यक्ष विजय पावडे यांनी सांगितले. राज्य शासनाने आपले मानधन वाढवले, त्याला साडेपाच वर्षे उलटून गेली. आपण आपली सर्व कर्तव्ये तर पार पाडलीच पण कोरोना काळात दिवस रात्र कष्ट घेतले. पण त्याचे फळ काय मिळाले? असे म्हणत आंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपला राग व्यक्त केला.
महागाई वाढली पण मानधन नाही : महागाई दुप्पटीने वाढली पण मानधनात वाढ नाही, अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ नाही, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवा समाप्तीचा लाभ नाही, आजारपणात रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील मिळत नाहीत. डिजिटल इंडियाच्या गप्पा भंगारात जायच्या लायकीचा झाल्या आहेत. आपण वर्षभरापासून नवीन मोबाईलसाठी आंदोलने केली. मात्र, नवीन मोबाईल मिळाला नाही. इंग्रजी भाषेतील सदोष पोषण ट्रॅकर ॲप आपल्यावर लादला. आपल्या खाजगी मोबाईलवरून जमत नसेल तर त्यांना वेठीला धरले. तो भरायला भाग पाडले, उच्च न्यायालयाचे आदेश देखील धाब्यावर बसवले. न्यायालयाचे आदेश झुगारून आपला प्रचंड छळ केला, धमक्या दिल्या. मग दिले तरी काय? असं संतापजनक प्रश्न त्यांनी विचारला आहे. आश्वासने आणि फक्त आश्वासनेच देण्यात आली. आता या सर्व गोष्टींचा कडेलोट झाला आहे. आपली सहनशक्ती संपली आहे. आपण आता रणशिंग फुंकले आहे. अटीतटीची लढाई लढायला आता आपण सज्ज व्हायचे आहे असे प्रतिपादन यावेळी संघटनेने केले आहे.
२० फेब्रुवारीपासून बेमुदत संप : २० फेब्रुवारी २०२३ पासून आपण बेमुदत संपावर जाणार आहोत. अंगणवाड्या बंद, सर्व कामकाज बंद, पोषण ट्रॅकर तर भरणारच नाही, अहवाल आणि माहिती पण देणार नाही, असे कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे. आता घरात बसून रहायचे नाही, रस्त्यावर उतरून लढायचे, हा आपला निर्धार आहे. यामध्ये फेब्रुवारीला राज्य शासन आणि प्रशासनाला आपली नोटीस बजावली जाईल.त्यानंतर सर्व जिल्हा परिषदा आणि प्रकल्प कार्यालयांना मोर्चा काढून नोटीस दिली जाईल. २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरू होईल. असे आयटकच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आता मागे हटणे नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बाल विकास अधिकारी यांना निवेदन देताना जिल्हा सचिव वंदना कोळणकर, मैना उईके, सुषमा ढोक, अरुणा नागोसे, गोदावरी राउत, यांची उपस्थिती होती