पिंपरी-चिंचवड : शहरातील कुदळवाडी परिसरात पिंपरी चिंचवड महापालिका जवळपास 5000 अनधिकृत बांधकामावर बुलडोजर लावून पत्राशेड बांधकामं काढून टाकण्याची कारवाई करत आहे. शेकडो जेसीबी मशीन आणि बुलडोजर लावून तसंच मोठा फौजफाटा लावून पिंपरी चिंचवड महापालिका पिढ्या न पिढ्यांपासून कुदळवाडी परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कायद्याचा धाक दाखवत कारवाई करत आहे.
आमच्यावर सूडबुद्धीने कारवाई : जवळपास 250 एकर वरील 1500 पेक्षा जास्त बेकायदा बांधकामे पिंपरी चिंचवड महापालिकेनं जेसीबी आणि बुलडोजर लावून जमीनदोस्त केली. आमचं योग्य पुनर्वसन न करता आणि स्क्रॅप मॅनेजमेंट यार्ड उपलब करुन न देता महापालिका आमच्यावर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप कुदळवाडी परिसरातील व्यापारी, व्यावसायिक करत आहेत.
व्यापाऱ्यांना कायद्याचा धाक : पिंपरी चिंचवड शहराची ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्रियल हब अशी ओळख आहे. या इंडस्ट्रीमधून मोठ्या प्रमाणात स्क्रॅप निघतं. इंडस्ट्रीमधून निघणारं स्क्रॅप खरेदी करणारी आणि त्यावर प्रक्रिया करणारी सर्वात जास्त दुकानं ही कुदळवाडी परिसरात आहेत. मात्र महापालिका पिढ्या न पिढ्यापासून व्यापाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवून त्यांचा व्यवसाय संपुष्टात आणत आहे.
"चिखली येथील कुदळवाडी भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या मोहिमेअंतर्गत आज अखेरपर्यंत २०२ लाख २९ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेली २ हजार ८४५ अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्यात आली आहेत. तर या मोहिमेदरम्यान ४६५ एकर भूभागावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे".- शेखर सिंह, महापालिका आयुक्त
अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम : महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ फेब्रुवारी २०२५ पासून कुदळवाडी येथे अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने आणि इतर अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. आज मोहिमेच्या पाचव्या दिवशी, सुमारे ९३ एकर भूभागावर पसरलेल्या ४० लाख ५७ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या ५२८ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
चोख पोलीस बंदोबस्त : आजच्या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचेता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, महेश वाघमोडे, अजिंक्य येळे, शितल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कर्मचारी सहभागी झाले. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आधुनिक यंत्रांद्वारे कारवाई : कारवाईदरम्यान १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर निष्कासनासाठी करण्यात आला. तसंच महापालिकेचे ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस कर्मचारी आणि मजूर यांचा समावेश होता. सुरक्षेसाठी ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.
अतिक्रमण निष्कासनाची कारवाई : महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेतून कुदळवाडी येथे नियोजित विकास आरक्षणे आणि नागरी सुविधा जागेवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती शेखर सिंह यांनी दिली.
हेही वाचा -